1800 जणांना व्हायचंय नगरसेवक !शंकर जाधव - सोलापूरविविध राजकीय पक्षांकडे तब्बल १८०० इच्छुकांनी नगरसेवकपदाची स्वप्ने पाहून गौरवशाली इतिहास असलेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवनात प्रवेश करण्याचा मनसुबा आखला आहे. मुलाखतीच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करुन आपली ताकद दाखविण्याचा अनेकांनी प्रयत्न सुरु केला आहे. नेहमीप्रमाणे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना या प्रमुख पक्षांकडे इच्छुकांचा सर्वाधिक लोंढा आहे.महापालिकेत सत्ता कायम राखण्यासाठी काँग्रेस पक्षाने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा योग साधून ‘व्हिजन ७५’ हे लक्ष्य ठेवले आहे; मात्र राष्ट्रवादीबरोबर काँग्रेसची आघाडी झाल्यास या पक्षाच्या नेत्यांचे लक्ष्य अधुरे राहणार आहे. काँग्रेसच्या मानाने शहरात राष्ट्रवादीची ताकद कमकुवत आहे. नेते अधिक आणि कार्यकर्ते कमी अशी राष्ट्रवादी काँग्रेसची शहरात अवस्था आहे. काँग्रेसकडे तब्बल ३८७ जणांनी मुलाखती दिल्या आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे २८० जणांनी अर्ज दाखल केले आहेत. या पक्षाच्या इच्छुकांच्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वत: शुक्रवारी मुलाखती घेणार आहेत.राज्यातील आणि केंद्रातील सत्तेचा केंद्रबिंदू मानून भाजपने इंद्रभुवनवर डोळा ठेवला आहे. पण हे करताना मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेशी युती करावयाची की नाही, या संभ्रावस्थेत आजही भाजपचे स्थानिक नेते आहेत. तशीच स्थिती शिवसेनेची आहे. शहरात शिवसेनेची सूत्रे नेमकी कोणाकडे?, हा शिवसैनिकांचा मोठा प्रश्न पडला आहे. भाजपकडे सर्वाधिक म्हणजे ४५० इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. या पक्षाच्या इच्छुकांच्या अद्याप मुलाखती बाकी आहेत. शिवसेनेकडे ३१२ जणांनी मुुलाखती दिल्या असून युती होण्यापूर्वीच शिवसेनेने इच्छुकांच्या मुलाखती घेऊन सर्वांनाच गुलदस्त्यात ठेवले आहे.भाजपचा आणखी एक मित्रपक्ष असलेल्या रिपाइं आठवले गटाला भाजपने अद्यापही मोजले नाही. असे असले तरी रिपाइं आठवले गट भाजपशी जुळवून घेण्यास तयार असून या पक्षाने १३ जागांची मागणी केली आहे. रिपाइं आठवले गटाची सारी सूत्रे प्रदेश सरचिटणीस राजा सरवदे यांच्याकडे आहेत. भाजपचा दुसरा मित्रपक्ष राष्ट्रीय समाज पक्षाकडे ४० जणांनी उमेदवारी मागितली आहे. रिपाइं आठवले गटाप्रमाणेच रासपलाही भाजपने अद्याप मोजले नाही. भाजप-शिवसेनेची युती झाल्यास रिपाइं आठवले गट आणि रासप या मित्र पक्षाला सामावून घेताना भाजपला डोकेदुखी ठरणार आहे. रासपची सूत्रे जिल्हा संघटक विजयकुमार हत्तुरे यांच्या हाती आहेत.बहुजन समाज पार्टीची ‘अकेला चलो रे’ भूमिका असून पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशिवाय बसपाची सारी सूत्रे विद्यमान नगरसेवक आनंद चंदनशिवे हेच हलवित आहेत. या पक्षाकडे ४५ इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे.एमआयएम आणि रिपाइं (पीजी) यांच्यात हातमिळवणी होण्याचे संकेत असून एमआयएमकडे ४५ जण तर रिपाइं पीजी ग्रुपकडे २५ जणांनी उमेदवारीची मागणी केली आहे. एमआयएमची सूत्रे तौफिक शेख यांच्याकडे तर रिपाइं पीजी ग्रुपची सूत्रे प्रमोद गायकवाड यांच्याकडे आहेत. पीपल्स रिपब्लिकन पार्टी गेल्या खेपेप्रमाणे काँग्रेससोबत जाण्याचे संकेत असून या पक्षाकडे १५ इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. पीपल्स रिपाइंचे सूत्रे राजा इंगळे यांच्याकडे आहेत.गेल्या खेपेस पूर्ण ताकद लावूनही एकही जागा पदरात न पडलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याही खेपेस ताकदीनिशी निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे. या खेपेस मनसेकडे ९७ जणांनी उमेदवारी मागितली आहे. या पक्षाची सूत्रे युवराज चुंबळकर यांच्या हाती आहेत.समाजवादी पार्टीनेही या निवडणुकीत मुसंडी मारण्याची तयारी सुरु केली असून या पक्षाकडे २८ जणांनी उमेदवारी मागितली आहे. या पक्षाची सूत्रे सपाचे प्रमुख इम्रान खान हे हलवित आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडे ५० जणांनी उमेदवारी मागितली असून पूर्व भागात प्रभाव असलेल्या सहा प्रभागावर माकपने लक्ष्य केले आहे. या पक्षाची सारी सूत्रे माजी आ. नरसय्या आडम मास्तर यांच्या हाती आहेत.रिपाइं गवई गट गेल्या खेपेसही काँग्रेससोबत जाण्याचे संकेत असून या पक्षाकडे १५ जण इच्छुक आहेत. या पक्षाची सूत्रे रिपाइं गवई गटाचे प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे हे हलवित आहेत.त्या त्या पक्षाचे गॉडफादर............काँग्रेस - सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदेराष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवारभाजप - सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुखशिवसेना - पुरुषोत्तम बरडे, महेश कोठेबसपा - आनंद चंदनशिवेरिपाइं (ए) - राजा सरवदेरिपाइं (पीजी) - प्रमोद गायकवाडरिपाइं (गवई) - सुबोध वाघमोडेरिपाइं (पीपल्स) - राजा इंगळेमनसे - युवराज चुंबळकरसपा - इम्रान खानमाकप - नरसय्या आडमरासप - विजयकुमार हत्तुरेएमआयएम - तौफिक शेख.
1800 जणांना व्हायचंय नगरसेवक !
By admin | Updated: January 24, 2017 18:36 IST