२७२ शाळांमधील १३ हजार विद्यार्थी घेताहेत ऑनलाईन धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:48 IST2021-09-02T04:48:01+5:302021-09-02T04:48:01+5:30
मल्लिकार्जुन देशमुखे मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २७२ शाळांतील व खासगीच्या शाळेतील सुमारे १३ हजार ७२० विद्यार्थी शिक्षणाचे ...

२७२ शाळांमधील १३ हजार विद्यार्थी घेताहेत ऑनलाईन धडे
मल्लिकार्जुन देशमुखे
मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २७२ शाळांतील व खासगीच्या शाळेतील सुमारे १३ हजार ७२० विद्यार्थी शिक्षणाचे ऑनलाईन धडे घेत आहेत. ज्या विद्यार्थ्यांकडे अँड्रॉईड मोबाईल नाहीत, अशा विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत शिक्षकांची थेट वारी पोहोचते. गृहभेट या उपक्रमातूनही विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
तालुक्यात झेडपीच्या १८३ व खासगी ८९ शाळा कार्यरत आहेत. ६४१ शिक्षक, १३ केंद्रप्रमुख, ३ विस्ताराधिकारी, ६ विषय साधन व्यक्ती, ५ विशेष शिक्षक, तर २ विशेषतज्ज्ञ कार्यरत आहेत. या यंत्रणेकडून तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेची शिक्षण यंत्रणा सांभाळली जात आहे.
विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद होऊ नये म्हणून ‘ऑनलाईन शिक्षणा’ची पर्यायी संकल्पना समोर आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व शिक्षणाधिकारी संजय राठोड यांनी स्वतः शाळा भेटीतून मार्गदर्शन केले. गटशिक्षणाधिकारी पी. के. लवटे यांनी ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा वापर करून उद्भवलेली परिस्थिती हाताळली. तालुक्यातील तंत्रस्नेही उपक्रमशील शिक्षकांच्या मदतीतून झूम ॲप, दीक्षा ॲप, गुगल मिट व्हर्चुअल क्लासरूम व्हाट्सॲप ग्रुप आदींच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवी वर्गातील सुमारे १३ हजार ७२० विद्यार्थ्यापर्यंत ऑनलाईन शिक्षण गृहभेटीच्या माध्यमातून पोहोचविण्यात आले. सोबतच सेतू अभ्यासक्रम, स्वाध्याय आदी उपक्रमातूनही विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे मिळत आहेत.
---
मंगळवेढा तालुक्यात २७२ शाळेतील सुमारे १३ हजार ७२० विद्यार्थी शिक्षणाचे ऑनलाईन धडे घेत आहेत. ६४१ शिक्षक, विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख, विषयतज्ज्ञ, शिक्षक हे विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता राखण्याचे कार्य करत आहेत.
-पी. के. लवटे, गटशिक्षणाधिकारी, मंगळवेढा
---