दिल्लीमधील एका हृदयस्पर्शी घटनेने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. एका रिक्षा चालकाच्या कृतीने परदेशी पर्यटकाचं मन जिंकलं. यानंतर ही घटना सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आणि लाखो लोकांनी रिक्षा चालकाचं भरभरून कौतुक केलं आहे. व्हिडिओमध्ये, एक परदेशी महिला दिल्ली फिरण्यासाठी आली होती आणि रिक्षामधून प्रवास करत होती.
जेव्हा महिलेने चालकाला पैशाबाबत विचारलं तेव्हा तिच्याकडे सुटे पैसे नसल्याने ती थोडी अस्वस्थ झाली. त्या महिलेने ड्रायव्हरला सांगितलं की तिला पैसे सुटे करण्यासाठी कुठेतरी थांबायचं आहे. यावर चालक कोणतेही आढेवेढे न घेता "काही हरकत नाही, तुम्ही पुढे जाऊ शकता" असं म्हणाला. त्यानंतर महिलेला आरामात पुढे जाण्याचा इशारा केला.
जेव्हा त्या महिलेने चालकाचं हे वर्तन पाहिले तेव्हा ती खूप प्रभावित झाली आणि व्हिडिओमध्ये म्हणाली, हे खूप चांगले आहे. मला त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं करायचं आहे. महिलेने सांगितलं की, तिला चालकाच्या दयाळूपणाबद्दल काहीतरी द्यायचं आहे. तिने त्याला दोन हजार रुपये गिफ्ट म्हणून दिले आणि तुमचे कुटुंब आनंदी राहो असंही सांगितलं.
या संभाषणानंतर रिक्षा चालक खूप आनंदी झाला. त्याच्या साधेपणा त्याच्या वागणुकीतून दिसत आहे. त्याने परदेशी महिलेला सांगितलं की त्याला चार मुलं आहे. एक मुलगा आणि तीन मुली आहेत. यानंतर महिलेने चालकाला त्याच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि आभार मानले.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर तारा नावाच्या अकाउंटवरून हा व्हायरल व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, जो आतापर्यंत २५ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर लाखो लोकांनी तो लाईक केला आहे आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्स विविध कमेंट करत आहेत.