एकीकडे दरोडे, चोरीसारख्या घटना कानावर येत असतानाच काही लोक मात्र त्यांच्या प्रामाणिकपणाने सगळ्यांची मने जिंकून घेतात. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे, जी ऐकल्यावर तुम्ही देखील या व्यक्तीचे कौतुक कराल. बंगळुरूमध्ये राहणाऱ्या एका तरुणीने आपला हा अनुभव लिंक्डइनवर शेअर केला आहे. आपल्या पोस्टमध्ये तिने रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा सांगितला आहे.
बंगळुरूमध्ये राहणाऱ्या संभावी श्रीवास्तव नावाच्या तरुणीने इंदिरानगरमध्ये रॅपिडो राईड बुक केली होती. आपला प्रवास पूर्ण करून ती रिक्षातून उतरून निघून गेली. पण, तिचा इयरफोन मात्र रिक्षातच राहील. रिक्षातून उतरल्यावर संभावीने गुगल पेद्वारे रिक्षा चालकाला पैसे देऊ केले होते. त्यामुळे गुगल पेकहा मेसेज बॉक्स सुरू झाला होता. अखेर शक्कल लढवून या रिक्षा चालकाने गुगल पेवर मेसेज पाठवून संभावीचा इयरफोन परत केला. तिने आपला हाच अनुभव पोस्टमध्ये शेअर केला आहे. 'हे जग वाटतं तितकं वाईट नाही' असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
काय म्हणाली संभावी?
संभावीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, "रिक्षा चालकाने मेसेज करून मला सांगितले की, ते माझा इयरफोन व्यवस्थित जपून ठेवतील. याबरोबरच त्यांनी मी त्या भागात पुन्हा कधी येणार आहे, असे विचारले. त्यावेळी मी त्यांना सोमवारी येईन म्हटले. पण दिवाळीच्या गडबडीत विसरून गेले. नंतर दुसऱ्या दिवशी मी सकाळी ८:३०च्या सुमारास त्यांना फोन केला आणि सांगितले की, जर ते कधी या बाजूला आले तर मी ऑफिसमध्येच असेन. आणि आश्चर्य म्हणजे त्यांनी अर्ध्या तासानंतर फोन करून इयरफोन घेऊन आल्याचे सांगितले."
"खरंतर, त्यांना इतकी काळजी करण्याची गरज नव्हती. ते माझे इयरफोन फेकून देऊ शकले असते, वापरू शकले असते किंवा विकूही शकले असते, पण त्यांनी ते परत करण्याचा निर्णय घेतला. वाटायला ही अगदी एक छोटीशी गोष्ट वाटते, पण यामुळे मला खरोखर जाणवलं की, या जगात प्रामाणिकपणा अजूनही शिल्लक आहे", असे संभावी म्हणाली.
रॅपिडो रिक्षाचालकाला देणार बक्षीस
रॅपिडोने या पोस्टला प्रतिसाद देत चालकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले आणि त्याच्या दयाळू कृत्याबद्दल त्याला सन्मानित केले जाईल, अशी घोषणा केली. कंपनीने लिहिले, "संभावी, इतका हृदयस्पर्शी अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद. जहारुलच्या प्रामाणिकपणा आणि दयाळूपणाबद्दल ऐकून आम्हाला खूप आनंद झाला. त्याच्यासारखे लोक खरोखरच समाजात दुर्मिळ असतात आणि ते आमच्या रॅपिडो कुटुंबात सामील झाल्याचा आम्हाला अभिमान आहे." रॅपिडोने नंतर आणखी एक अपडेट दिली, ज्यामध्ये त्यांनी कॅप्टन जहारुलला इयरफोन परत केल्याबद्दल बक्षीस दिल्याचे म्हटले आहे.
या घटनेने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधले आहे. अनेकांनी ड्रायव्हरच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले आहे. एका वापरकर्त्याने लिहिले की, "हे खूपच दुर्मिळ आहे. आणि म्हणूनच हा व्यक्ती कौतुकास पात्र आहे," तर दुसऱ्याने लिहिले की, "हे खरोखरच हृदयस्पर्शी आहे. अशा छोट्या कृती लोकांमध्ये विश्वास निर्माण करतात."
Web Summary : Bengaluru woman forgot earphones in auto. Driver found her via Google Pay, returned them. Rapido rewarded his honesty, proving goodness exists.
Web Summary : बेंगलुरु की महिला ऑटो में ईयरफोन भूल गई। ड्राइवर ने गूगल पे के जरिए उसे ढूंढा, लौटाया। रैपिडो ने उसकी ईमानदारी को पुरस्कृत किया, साबित हुआ अच्छाई मौजूद है।