फुटबॉल खेळण्यासाठी विशेष क्रीडा गणवेशाची गरज असते, हा समज ओडिशातील महिलांनी खोडून काढला आहे. सुंदरगड जिल्ह्यातील कोइडा येथील बडबलीजोर गावात पार पडलेल्या एका अनोख्या फुटबॉल सामन्याने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या सामन्यात महिलांनी साडी नेसून मैदानात फुटबॉलचा थरार रंगवला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
ओडिशाच्या माओवादग्रस्त पट्ट्यात मोडणाऱ्या या भागात महिलांनी केवळ सहभाग नोंदवला नाही, तर पूर्ण आत्मविश्वासाने खेळही केला. २५ ते ४० वयोगटातील या महिलांनी साडी नेसूनही ज्या चपळाईने मैदानात धाव घेतली, ते पाहून प्रेक्षक थक्क झाले. घराच्या चार भिंतींच्या आत राहूनही महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत, असाच संदेश या खेळाडूंनी दिला.
हा सामना केवळ मनोरंजनासाठी नसून तो एका जागरूकता उपक्रमाचा भाग होता. समाजात खेळांबाबत असलेले लिंगभावाचे अडथळे तोडणे, हा यामागचा मुख्य उद्देश होता. साडी सांभाळत महिलांनी केवळ फुटबॉल खेळला नाही तर, समाजात सकारात्मक मेसेज दिला आहे. या सामन्यात प्रामुख्याने २५ ते ४० वयोगटातील गृहिणी आणि महिला सहभागी झाल्या होत्या. ताकद आणि कौशल्य हे कपड्यांवर अवलंबून नसून ते व्यक्तीच्या धैर्य आणि आत्मविश्वासावर अवलंबून असते, हे या महिलांनी सिद्ध केले.
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
बडबलीजोर गावातील हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटिझन्सकडून या महिलांचे जोरदार कौतुक होत आहे. "जिद्द असेल तर कपडे अडथळा ठरत नाहीत," अशा प्रतिक्रिया युजर्स देत आहेत. साडी नेसूनही खेळाप्रती असलेली ही निष्ठा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. या उपक्रमामुळे सुंदरगड जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणाची नवी चर्चा आता सुरू झाली आहे.
Web Summary : Odisha women defied norms by playing football in sarees. The match in a Maoist-affected area promoted gender equality in sports, showcasing skill and determination beyond attire. It inspired empowerment discussions.
Web Summary : ओडिशा में महिलाओं ने साड़ी पहनकर फुटबॉल खेला। माओवाद प्रभावित क्षेत्र में यह मैच खेलों में लैंगिक समानता को बढ़ावा देता है, जो पोशाक से परे कौशल और दृढ़ संकल्प को दर्शाता है। इसने सशक्तिकरण पर चर्चा को प्रेरित किया।