मोठे आणि प्रशस्त घर प्रत्येकाचे स्वप्न असते, पण जागेची कमतरता आणि वाढत्या महागाईमुळे अनेकांना आपले स्वप्न अर्धवट सोडावे लागते. मात्र, बिहारमधील एका तरुणाने शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये त्याने ५२ इंच रुंद आणि दोन मजली असलेल्या एका घराचे अद्भुत दृश्य दाखवले आहे. एवढ्या कमी जागेतही या घरात सर्व सुख-सुविधा उपलब्ध असल्याने लोक हा व्हिडीओ पाहून अवाक् झाले आहेत.
हा अनोखा व्हिडीओ बिहारचा कंटेंट क्रिएटर आदित्यने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंट 'adityaseries01'वर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, हे घर इतके अरुंद आहे की दरवाजा उघडताच आदित्यला आपले हातही नीट पसरवता येत नाहीत. पण, एवढ्या छोट्या जागेतही प्रत्येक गरजेची वस्तू व्यवस्थित बसवण्यात आली आहे.
काय काय आहे 'या' घरात?
घराच्या आतमध्ये प्रवेश करताच समोर देवीचे एक छोटेसे मंदिर आहे. त्याच्या बाजूला तीन फूट रुंद पलंग आहे, जिथे घरातील लोक झोपतात. त्यानंतर, एक लहानसे पण व्यवस्थित किचन आहे, जिथे प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळे कप्पे बनवण्यात आले आहेत. भांडीसुद्धा भिंतीवर टांगून ठेवलेली आहेत. विशेष म्हणजे, या घरात वॉशरूम आणि बाथरूमही वेगवेगळे आहेत.
या घराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये वरच्या मजल्यावर जाण्यासाठी शिडी आहे. पण, ही शिडी इतकी अरुंद आहे की, एका वेळी एकच व्यक्ती वर किंवा खाली जाऊ शकतो. व्हिडीओमधील माहितीनुसार, हे घर ५० फूट लांब आणि ४ फूट ४ इंच रुंद आहे.
व्हिडीओ झाला व्हायरल!
५२ इंचाच्या या आलिशान घराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झाला आहे. अवघ्या दोन दिवसांत हा व्हिडीओ १ कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे, तर याला १.७७ लाखांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
काही नेटकऱ्यांनी हे घर पाहून चिंता देखील व्यक्त केली आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले की, "हे घर बघूनच माझा जीव गुदमरत आहे. इथे व्हेंटिलेशन नाही. मी इथे राहण्याची कल्पनाही करू शकत नाही." तर दुसऱ्या एका युजरने भावूक होऊन म्हटले की, "कसेही असो, पण त्याचे स्वतःचे घर आहे, हेच खूप आहे." तिसऱ्या एका नेटकऱ्याने विनोदी कमेंट केली की, "सर्व काही आहे, फक्त ऑक्सिजनची कमतरता आहे." एका युजरने मनाला स्पर्श करणारी प्रतिक्रिया दिली आणि म्हटले की, "गरीब माणसाला स्वतःचे घर मिळाले हीच मोठी गोष्ट आहे. घर किती मोठे किंवा छोटे आहे, याने फरक पडत नाही."