मुंबई - मागील आठवड्यात काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार यादीतील घोळ पुराव्यासह समोर आणला. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत बंगळुरूतील एका मतदारसंघाचं उदाहरण देत मतदार यादीवर प्रश्नचिन्ह उभे केले. त्यानंतर सत्ताधारी पक्षाने राहुल गांधी यांच्यावर आरोप केले. आता महाराष्ट्रातील असाच एक प्रकार समोर आला आहे, ज्यात एकाच चेहऱ्याची, एका नावाची महिला मतदार यादीत ६ वेळा तिचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यात तिच्या नावाने वेगवेगळे EPIC क्रमांक असल्याचे दिसून येते.
सुषमा गुप्ता असं या महिलेचे नाव आहे. पालघरमधील मतदार यादीत सुषमा यांचे नाव ६ वेळा मतदार यादीत आहे परंतु त्यात प्रत्येकाचा EPIC नंबर वेगळा आहे. सोशल मीडियावर याचा फोटो बराच व्हायरल होत आहे. त्यात 'लोकमत'ने निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जात हा प्रकार सत्य आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या महिलेचे नाव, तिच्या पतीचे नाव टाकल्यानंतर तिच्या नावाने वेगवेगळे EPIC असलेले मतदानमतदान कार्ड समोर आले आहेत. त्यात पालघर जिल्ह्यातील मतदारसंघात तिच्या नावाचा उल्लेख आहे.
राहुल गांधींनी काय केला होता आरोप?
मतचोरीच्या मुद्द्यावरुन सध्या देशातील राजकारण तापले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार यादीतील अनियमिततेबाबत गंभीर आरोप केले आहेत. मतचोरी ही एक व्यक्ती, एक मत या मूलभूत लोकशाही सिद्धांतावर हल्ला आहे. स्वतंत्र व निष्पक्ष निवडणुकांसाठी स्वच्छ-पारदर्शक मतदार यादी गरजेची आहे. पारदर्शकता दाखवावी व डिजिटल मतदार यादी सार्वजनिक करावी. त्यामुळे जनता व राजकीय पक्षांना त्याचे स्वतःचे आडिट करता येईल अशी मागणी राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला केली आहे.
दरम्यान, 'मतचोरी' विरुद्ध संसदेत सातत्याने आक्रमक असलेले काँग्रेससह इतर विरोधी पक्ष सोमवारी संसदेबाहेरही एकवटले. विरोधी पक्षाच्या जवळपास ३०० खासदारांसह नेत्यांनी संसदेपासून निवडणूक आयोगाच्या दिशेने मोर्चाच्या माध्यमातून कूच केली. मात्र, पोलिसांनी हा मोर्चा अडवत नेत्यांना ताब्यात घेतले. राहुल गांधी यांनी मतदारयाद्यांत कथित घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर विरोधी पक्षांची ही पहिलीच निदर्शने होती.'व्होट चोरी'चे हे मॉडेल भाजपला लाभ देण्यासाठी लागू करण्यात आले आहे असं राहुल गांधी यांनी बंगळुरूच्या महादेवपुरा विधानसभा मतदारसंघातील आकडेवारी मांडून ७ ऑगस्ट रोजी आरोप केला होता.