Viral Video:हिमाचल प्रदेशातील विविध पर्यटन स्थळांना दरवर्षी हजारो लोक भेट देतात. यामध्ये भारतीयांसह परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. पण, बहुतांशवेळा अशा ठिकाणी पर्यटकांकडून कचरा केल्याचे पाहायला मिळते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका परदेशी पर्यटकाने भारतीयांनी केलेला कचरा उचलताना पाहायला मिळत आहे. या कृतीद्वारे या परदेशी पर्यटकाने भारतीयांना आरसा दाखवल्याचे बोलले जात आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एका धबधब्याखाली लोक मजा करताना पाहायल मिळतात. यादरम्यान, एक परदेशी नागरिक भारतीय पर्यटकांनी फेकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, चिप्सची पाकीटे आणि बाटल्या उचलताना दिसतोय. धक्कादायक बाब म्हणजू, हा एकटा व्यक्ती कचरा उचलतोय, पण तिथे उपस्थित असलेल्या कोणत्याही भारतीयाला त्याची मदत करावी वाटली नाही.
यादरम्यान एक स्थानिक तरुणाने या परदेशी व्यक्तीचे कृत्य कॅमेऱ्यात रेकॉर्ड केले. व्हिडिओ बनवताना तो त्याचे कौतुकही करतो. निखिल नावाच्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, 'हे लज्जास्पद आहे. एक परदेशी पर्यटक निसर्गाबद्दल काळजी घेतो, पण स्थानिक पर्यटक निर्लज्जपणे इतक्या सुंदर ठिकाणी कचरा फेकत राहतात. यासाठी कोणत्याही सरकार किंवा प्रशासनाला दोष देऊ नये. आपल्याला स्वच्छ देश हवा असेल, तर लोकांना बदलावे लागेल.'
हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर होताच तो लाखो वेळा पाहिला गेला, तर अनेकांनी व्हिडिओबद्दल आपले मतही व्यक्त केले. एका युजरने लिहिले, हे परदेशी लोक आपल्यापेक्षा जास्त काळजी घेतात, म्हणूनच आपण त्यांच्या मागे आहोत. दुसऱ्याने लिहिले, भावाला मनापासून सलाम. तर तिसऱ्याने लिहिले, आम्ही अशा परदेशी पर्यटकांचा मनापासून आदर करतो.