परदेशी म्हणजेच फॉरेनर नागरिकांना पाहून अनेकांना त्यांच्याबद्दल उत्सुकता निर्माण होते. अनेकांच्या मनात भलते सलते विचारही येतात. अनेकजण त्यांना फसविण्यासाठी प्रयत्नही करतात. गोव्यातील लोकांना फॉरेनर नवीन नसले तरी इतर भारतासाठी फॉरेनर म्हणजे आकर्षण आहेत. त्यांना त्रासही दिला जातो. प्रवासात असतील किंवा अन्य कोणत्या पर्यटन स्थळी त्यांच्यावरील अनेकांच्या नजरा हटत नाहीत. दिल्ली ते आग्रा रेल्वे प्रवासात असाच वाईट अनुभव एका परदेशी महिलेला आला आहे. तिने याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून तिला लोकांनी अशा लोकांपासून दूर राहण्यास सांगितले आहे.
सोलो ट्रॅव्हलर असलेल्या महिलेसोबत हा प्रकार घडला आहे. ही महिला विविध देशांत फिरत असते. तेथील सौंदर्य, पर्यटन स्थळांना भेटी देत याची माहिती तिच्या चाहत्यांना देत असते. दिल्ली ते आग्रा दरम्यान ती पहिल्यांदाच रेल्वेने प्रवास करत होती. यावेळी तिच्या बाजुच्या सीटवर असलेल्या तरुणाने तिला त्रास द्यायला सुरुवात केली. तो तिच्यासोबत बळजबरीने सेल्फी काढू लागला. तिच्याशी बोलू लागला. तिला विश्रांती घ्यायची होती.परंतू तिने इंग्रजीत सांगूनही तो काही ऐकेना. तो सारखा सारखा तिच्याशी स्थानिक भाषेत बोलत होता.
त्याची तक्रार करावी तर रेल्वेत नाश्ता आणणाऱ्या माणसाशिवाय तिला एकही कर्मचारी दिसला नाही, हे तर वेगळेच दुखणे. या महिलेने त्याला टाळण्यासाठी खिडकीतून बाहेर पाहण्याचा प्रयत्न केला. तरीही तो मागेच लागला होता. तिने तिचा मोबाईल पाहिला, तेव्हा तो तिच्या मोबाईलमध्ये ती काय करतेय हे डोकावत होता. त्याला थोडीफार इंग्रजी येत असेल असे वाटून तिनेच शेवटी एक व्हिडीओ बनविला. यात तिने तो कसा त्रास देतोय ते सांगितले. परंतू, तो त्याच्याच धुंदीत होता, असा अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
इन्स्टावरील तिचे फॉलोअर्स तिला वेगवेगळे सल्ले देत आहेत. अतिथी देवो भव म्हणणारे आपण भारतीय परदेशी नागरिक भारतात पर्यटनासाठी येतात. त्यांना असा त्रास दिला तर ते भारताबद्दल त्यांच्या देशात गेल्यावर तेथील लोकांना कसे भारतात पर्यटनाला जा म्हणून उद्युक्त करतील, याचे भान राखणे गरजेचे आहे. सोबतच त्यांची प्रायव्हसी राखणेही गरजेचे आहे. याचबरोबर रेल्वेनेही पुरेसे जबाबदार अधिकारी तैनात ठेवणे गरजेचे आहे. अनेकदा टीसीला शोधत शोधत निम्मी रेल्वे पालथी घालावी लागते. तरी टीसी भेटत नाही, असे अनुभव आपल्यापैकी अनेकांना अनेकदा आले असतील. या महिलेला रेल्वे कर्मचारी दिसला असता तर कदाचित तिचा पुढचा प्रवास सुखकर झाला असता, परंतू तसेही झालेले नाही.