UP News: दारुडे दारू पिण्यासाठी वाटेल ते करायला तयार असतात. उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथे अशाच प्रकारची घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. अपघातात जखमी झालेला आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेला एक रुग्ण वैद्यकीय कर्मचारी आणि आपल्या नातेवाइकांना चकमा देत थेट दारुच्या दुकानावर पोहोचला. तो दारू प्यायला आणि परत रुग्णालयातील आपल्या बेडवर येऊन झोपी गेला.
ही घटना शाहजहांपूर येथील राजकीय मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलची असल्याचे समजते. अपघातात जखमी झालेला विपिन, निगोही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे. तो काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होता. त्याच्या शरीरात कॅथेटर लावलेले होते, तसेच डोक्यावर पट्टी बांधलेली होती. मात्र या अवस्थेतही तो गुपचूप रुग्णालयातून पळाला आणि थेट दारुच्या दुकानात पोहोचला.
विपिनने दारू विकत घेतली आणि जवळच्या हँडपंपचे पाणी मिसळून ती प्यायली. उरलेली बाटली त्याने खिशात ठेवली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विपिनच्या आईने सांगितले की, अपघात झाल्यापासून तो रुग्णालयातच आहे. त्याचे मानसिक संतुलन ठीक नाही. त्याची पत्नीही महिनाभर रुग्णालयात दाखल होती आणि शेवटी कर्करोगाने तिचा मृत्यू झाला. आता मुलगा वाया गेल्यामुळे घरचे खूपच त्रस्त आहेत.
राजकीय मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेश कुमार यांनी सांगितले की, हा व्हिडिओ त्यांच्या निदर्शनास आला आहे. या घटनेची चौकशी सुरू असून, चौकशीअंतीच पुढील कारवाई करण्यात येईल. दरम्यान, या घटनेमुळे मेडिकल कॉलेजच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. रुग्णालयात दाखल असलेला रुग्ण सहजपणे बाहेर जाऊन दारू विकत घेऊ शकतो, ही बाब प्रशासनाच्या दुर्लक्षाची जाणीव करून देते.