UP News: तुम्ही अनेकदा 'मौत का कुआ' पाहिला असेल. यात बाईक किंवा कारमध्ये बसून धोकादायक स्टंट केला जातो. या खेळात गंभीर दुखापत किंवा मृत्यूचा धोका आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील इथिया गावातून एक धक्कादायक आणि विचित्र घटना समोर आली आहे. येथील जत्रेत 'मौत का कुआं'मध्ये एका तरुणाचा स्टंट करताना तोल गेला आणि तो सुमारे १५ फूट उंचीवरून खाली पडला. पण, आश्चर्यकारक बाब म्हणजे, त्या तरुणाची बाईक सुमारे तासभर विहिरीच्या भिंतींवर अनियंत्रितपणे फिरत राहिली.
इथिया गावातील पंचमुखी शिव मंदिर संकुलात आयोजित 'सावन मेला' पूर्वांचलमध्ये 'मिनी बाबा धाम' म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी या जत्रेत मोठी गर्दी जमते आणि 'मौत का कुआं' हा स्टंट शो तर मुख्य आकर्षणांपैकी एक आहे. यावेळीही हजारो लोक स्टंट शो पाहण्यासाठी जमले होते. संत कबीर नगर जिल्ह्यातील इंद्र कुमार (२५ वर्षे) या शोमध्ये बाइक स्टंट करत होता. स्टंट करताना इंद्र कुमारचा तोल गेला आणि तो १५ फूट उंचीवरुन खाली पडला. अपघातानंतर आयोजकांनी स्टंट थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याची बाईक विहिरीच्या भिंतींवर अनियंत्रितपणे धावत राहिली. सुमारे एक तास बाईक भिंतींवर फिरत होती, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
हे विचित्र दृश्य पाहून मेळ्यात उपस्थित असलेले हजारो प्रेक्षक घाबरले. शेवटी काही धाडसी लोकांनी बाईक थांबवली आणि जखमी इंद्र कुमारला बाहेर काढले. त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामुळे मेळ्याच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
प्रत्यक्षदर्शींच्या मते अपघाताच्या वेळी ना प्रथमोपचार उपलब्ध होता, ना स्टंटसाठी योग्य सुरक्षा उपाययोजना केल्या होत्या. स्टंटमनकडे ना हेल्मेट होता ना इतर सुरक्षा उपकरणे. 'मौत के कुआं' सारख्या धोकादायक खेळांमध्ये सुरक्षेच्या मानकांकडे दुर्लक्ष केल्याने अपघात झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक तपासात सुरक्षेच्या मानकांचा अभाव असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी जत्रेत सर्व स्टंटबाजीवर तात्काळ बंदी घातली आहे.