देशाची प्रगती असो अथवा स्वच्छता, ती साधणे येथील प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे. यासाठी प्रत्येकाचे योगदान आवश्यक असते. आयपीएस म्हणून देशाची सेवा केलेल्या ८८ वर्षीय इंद्रजित सिंग सिद्धू यांचे जीवन कोट्यवधी तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. ते या वयातही सकाळीच उठून आपली सायकल गाडी (सायकल कार्ट) काढतात आणि चंदीगडच्या रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी बाहेर पडतात. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर सिद्धू यांचा व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्यांना सॅल्यूट केला आहे.
व्हिडिओ पोस्ट करत आनंद महिद्रा म्हणाले, "चंदीगडचे श्री इंद्रजीत सिंग सिद्धू यांची ही क्लिप मला कुणीतरी पाठवली. चंदीगडच्या सेक्टर 49 मधील शांत रस्त्यांवर ते सकाळी 6 वाजता निघतात. इंद्रजीत सिंग सिद्धू एक निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. एक सायकल कार्ट आणि आपली कर्तव्य भावना घेऊन, ते रस्त्यावर उतरतात आणि रस्त्याच्या बाजूचा कचरा उचलून रस्ता स्वच्छ करतात."
महिंद्रा लिहितात, "त्यांचे म्हणणे आहे की, स्वच्छ सर्वेक्षण यादीत चंदीगड बरेच खालच्या स्थानावर असल्याने आपण दुःखी होतो. मात्र, तक्रार करण्याऐवजी, त्यांनी कर्म करण्याचा मार्ग स्वीकारला. इंद्रजीत सिंगजी यांनी उचलेला एक एक कचरा स्वच्छतेपेक्षाही अधिक महत्वाचा आहे. हे एक उदाहरण आहे, हा एक विश्वास आहे. त्यांचे काम वयाची तमा न बाळगता, जीवन सार्थक बनवण्याचा विश्वास जागृत करते."
महिंद्रा पुढे म्हणतात, या जगात तरुण बहुतांश वेळा घाईत असतात. मात्र, एका माजी पोलीस अधिकाऱ्याची स्थिर पावले, आपल्याला जीवनाचा उद्देश कधीही संपत नसतो. सेवा करण्याची वेळ कधीच संपत नसते, असे सांगतात. रस्त्यांवरच्या या मूक योद्ध्याला सलाम."