लिओनार्डो डिकॅप्रियो आणि केट विन्सलेटच्या 'टायटॅनिक' मध्ये सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांची कास्टिंग झाली आणि टायटॅनिक तयार केला तर तो कसा असेल याचा AI ने बनवलेला व्हिडीओ सध्या खूपच व्हायरल होत आहे. या दोघांबरोबर इतर स्टारकास्ट बघून तर तुम्हीसुद्धा चक्रावून जाल.
AI जनरेटेड व्हिडिओमध्ये 'टायटॅनिक'ची पुनर्कल्पना करण्यात आली आहे. ज्यामध्ये बॉलीवूड स्टार माधुरी दीक्षित आणि सलमान खान मुख्य भूमिकेत आहेत. या क्लिपमध्ये लिओनार्डो डिकॅप्रियो आणि केट विन्सलेट यांच्या जागी आयकॉनिक दृश्यांमध्ये देसी कलाकारांचा समावेश आहे. व्हिडिओमध्ये इतर बॉलीवूड स्टार्सना देखील सहाय्यक भूमिकांमध्ये दाखवण्यात आले आहे, त्या भूमिका इतक्या चपखलपणे निवडल्या आहेत की क्षणभर आपल्यालाही हेवा वाटेल.
'हम आपके है कौन' पासून लोकप्रिय झालेले प्रेम आणि निशा अर्थात सलमान आणि माधुरी AI ने टायटॅनिकचे मुख्य कलाकार म्हणून निवडले आहेत. त्यात काही फ्रेम मध्ये माधुरी टायटॅनिकमधली रोझ या भूमिकेत अगदी शोभून दिसते. मात्र सलमानला टायटॅनिकमधला जॅक म्हणून रंगवताना AI ची कल्पकता थोडी कमी पडल्यासारखी वाटते. 'हम दिल दे चुके सनम' मधला सलमान इथे आणून चिकटवल्यासारखा वाटतो. मात्र बाकीचे कलाकार हुबेहूब मूळ कलाकारांच्या प्रतिमा शोभतात.
या व्हिडिओमध्ये आमिर खान फॅब्रिजियोच्या भूमिकेत, आदित्य पंचोली कॅल हॉकलीच्या भूमिकेत, अनुपम खेर कॅप्टनच्या भूमिकेत, नसरुद्दीन शाह थॉमस अँड्र्यूजच्या भूमिकेत, सिमी गरेवाल रूथ डेव्टीच्या भूमिकेत आणि फरीदा जलाल मार्गरेट ब्राउनच्या भूमिकेत आहेत. विविध कलाकार हे कथेत अखंडपणे मिसळतात, केवळ भूमिकेत दिसत नाहीत तर पार्श्वभूमीतही अगदी योग्य प्रकारे बसतात.
ही क्लिप ट्विटरवर शेअर करण्यात आली होती, ज्यामध्ये कॅप्शन होते, “AI Is FANTASTIC Titanic in Bollywood Style Ft. Madhuri Dixit & Salman Khan.”
हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो पाहता लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही लोकांनी कौतुक केले आहे तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. अशा प्रकारे मॉर्फिंग होऊ लागले तर भविष्य धोक्यात आहे असेही अनेकांनी म्हटले आहे. मात्र AI आपल्या दारात आले नसून आपण AI च्या उंबरठ्यावर आहोत हेच वास्तव आहे. ते दुर्लक्षित न करता त्याच्याशी मैत्री करणे यातच हुशारी आहे.
हा व्हिडीओ तुम्ही पाहिला नसेल तर पुढे दिलेल्या लिंकवर जरूर बघा आणि तुमच्या मते माधुरी-सलमानच्या जागी कोणाला घेता आले असते, हेही कमेंट करून सांगा.