सध्या रिल्सचा जमाना आहे. आजच्या गतिमान जगात तीस सेकंद थांबण्याइतकाही लोकांकडे वेळ नाही किंवा नजर स्थिरावेल याची शाश्वती नाही. स्क्रोलिंग करताना शेकडो गोष्टी नजरेखालून जातात. मात्र त्यापैकी मोजक्या गोष्टीच लक्षवेधी ठरतात. रिल्सच्या बाबतीतही तसेच आहे.
ट्रेंडिंग गाण्यावर डान्स केला नाही तर तो फाऊल मानला जातो की काय अशी आजची स्थिती आहे. त्यामुळे एकाच गाण्यावर वेगवेगळ्या रंग-रूपाचे, वयाचे, मापाचे, भाषेचे लोक थिरकताना दिसतात. त्यात काही लोकांना ट्रेंड फक्त अटेम्प्ट करायचा असतो तर काहींना त्यात आपली कल्लाकारी दाखवायची असते. कारण प्रत्येक कलाकार आपल्या कलेतून व्यक्त होत असतो. असाच एक आहे तरुण चित्रकार सुदिप्तो! त्याने 'एक नंबर तुझी कंबर' या गाण्यावर केलेला रील अगदीच हटके आहे.
तुम्ही जर या रील मध्ये डान्स स्टेप शोधणार असाल तर त्या तुम्हाला नक्कीच सापडतील पण चित्रातून! सुदिप्तोने आपल्या फ्लिपआर्टमधून १९४ मूव्ह साकारल्या असून या गाण्यावर अफलातून रील तयार केला आहे. जो पाहता क्षणी तुम्हीदेखील न राहवून म्हणाल, 'एक नंबर...!'