Social Viral: पाणी काही सेकंदात मृत्यूचे कारण बनू शकते, याचा प्रत्यय छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये आला आहे. उसलापूर येथील गोकुलधाम परिसरात एका घराच्या लाद्या अचानक फुटून पाण्याचा असा काही भयानक कारंजा उडाला की, जणू जमिनीच्या आत एखादा मोठा विस्फोट झाला असावा. या घटनेत घराचा मालक मृत्यूच्या दाढेतून थोडक्यात बचावला असून ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
गोकुलधाममधील रहिवासी विशाल शर्मा यांच्या घरात २९ जानेवारीच्या रात्री साडेआठच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. विशाल शर्मा रात्री घरी पोहोचले तेव्हा त्यांच्या घराशेजारील मोकळ्या जागेवर हाय-प्रेशर बोरिंगचे काम सुरू होते. विशाल घराच्या अंगणात उभे असतानाच, अचानक जमिनीखालून मोठा आवाज झाला आणि काँक्रीटच्या लाद्या फोडून पाण्याचा प्रचंड वेगाचा फवारा बाहेर आला. पाण्याचा दाब इतका होता की विशाल शर्मा अक्षरशः फेकले गेले, मात्र सुदैवाने त्यांना गंभीर इजा झाली नाही.
पाण्याचा विस्फोट का झाला?
भूगर्भशास्त्रज्ञ सचिन पराते आणि भूजल तज्ज्ञ विजय कुमार यांनी या घटनेमागचे तांत्रिक कारण स्पष्ट केले आहे. शेजारच्या प्लॉटमध्ये नवीन बोरिंग करताना हाय-प्रेशर तंत्रज्ञानाचा वापर केला जात होता. जमिनीत हवा आणि पाण्याचा दाब प्रचंड वाढल्यामुळे तो दाब जमिनीच्या आत इतरत्र सरकला. विशाल शर्मा यांच्या घरात एक जुनी बोरिंग होती, जी पूर्णपणे बंद न करता त्यावर फर्शी बसवण्यात आली होती. नवीन बोरिंगचा दाब या जुन्या पाईपमध्ये शिरला आणि कमकुवत झालेला पाईप फुटून पाणी थेट घराच्या लाद्या तोडून बाहेर आले.
कुटुंब थोडक्यात बचावले
या घटनेवेळी घरातील लहान मुले आतल्या खोलीत होती. जर मुले अंगणात असती तर मोठी जीवितहानी झाली असती, अशी भीती व्यक्त केली जात आहे. केवळ काही सेकंदात संपूर्ण घर पाण्याने भरले. या घटनेमुळे परिसरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष आणि स्थानिकांचा संताप
स्थानिक नागरिकांच्या मते, कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय आणि सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून हे बोरिंगचे काम सुरू होते. घटनेनंतर पोलिसांना माहिती देऊनही तातडीने कारवाई न झाल्याने रहिवाशांमध्ये संताप आहे. दाट लोकवस्ती असलेल्या भागात अशा प्रकारचे हाय-प्रेशर ड्रिलिंग करणे रहिवाशांच्या जीवावर बेतू शकते, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही जुनी बोरिंग बंद करून त्यावर बांधकाम करत असाल, तर ती बोरिंग शास्त्रीय पद्धतीने सील करणे गरजेचे आहे. अन्यथा, भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना घडू शकतात.
Web Summary : Chhattisgarh home wrecked as high-pressure boring caused a water explosion. An old, unsealed boring pipe failed, sending water erupting through the house. The homeowner narrowly escaped injury. Negligence in safety protocols during drilling sparked local outrage.
Web Summary : छत्तीसगढ़ में हाई-प्रेशर बोरिंग से पानी का विस्फोट हुआ, जिससे घर तबाह हो गया। एक पुराना, बिना सील किया बोरिंग पाइप फट गया, जिससे घर में पानी भर गया। मकान मालिक बाल-बाल बचा। ड्रिलिंग के दौरान सुरक्षा में लापरवाही से स्थानीय लोगों में आक्रोश है।