अनेकदा लोक आपला एकाकीपणा दूर करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात,पण सायबर गुन्हेगार अशाच लोकांना आपल्या जाळ्यात अडकवतात. एका ऑस्ट्रेलियन महिलेसोबतही असंच काहीसं घडलं आहे, जिने ऑनलाईन खरं प्रेम शोधण्याच्या नादात तब्बल ४ कोटी रुपये गमावले आहेत. तसेच ती बेघरही झाली आहे.
ऑस्ट्रेलियातील पर्थ येथील एका महिलेने प्रेमाच्या शोधात ४.३ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम ($७८०,०००) गमावली. फसवणूक करणाऱ्यांनी तिला विश्वासात घेऊन सर्व पैसे हिसकावून घेतले, ज्यामुळे महिलेने केवळ तिचे सर्व पैसे गमावले नाहीत तर ती बेघरही झाली. या घटनेने ऑनलाइन फसवणुकीचे धोके अधोरेखित केले आहेत आणि लोकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.
ऑस्ट्रेलियातील एनेट फोर्ड हिने या घटनेनंतर आता गावात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. महिलेने डेटिंग एपवर प्रेम शोधण्यास सुरुवात केली. तिच्या नवऱ्याने नवीन आयुष्य सुरू केलं. त्यामुळे हिनेही "प्लेंटी ऑफ फिश" नावाच्या डेटिंग साइटवर अकाऊंट तयार केलं. तिथे तिला 'विलियम' नावाचा एक माणूस भेटला, ज्याच्याशी तो बोलू लागली.
अनेक महिने बोलल्यानंतर 'विलियम' ने एनेट फोर्डचा विश्वास जिंकला आणि नंतर पैसे मागू लागला. त्याने सांगितले की त्याचं पाकीट क्वालालंपूरमध्ये चोरीला गेलं आहे आणि त्याला तातडीने २.७५ लाख रुपये (५,००० डॉलर्स) हवे आहेत. फोर्डने ही रक्कम पाठवली. यानंतर त्याने सांगितले की तो रुग्णालयात आहे आणि त्याला ऑस्ट्रेलियन डॉक्टरांना पैसे द्यावे लागतील. फोर्डने तेही पैसे दिले. त्यानंतर त्याने हॉटेलचं बिल भरण्यासाठी पैसे मागितले कारण त्याचे कार्ड साइट कर्मचाऱ्यांनी घेतलं होतं. अशा प्रकारे त्याने महिलेला गंडा घातला.