Lamborghini Urus : तुम्ही आतापर्यंत अनेक महागड्या गाड्या पाहिल्या असतील. अनेकांना महागड्या गाड्यांची आवड असते. काहींना तर आपल्या गाडीसाठी व्हीआयपी नंबर प्लेटही हवी असते. यासाठी ते हजारो-लाखो रुपये खर्च करायला तयार असतात. परंतु अलीकडेच केरळमधील एका हौशी व्यक्तीने आपल्या कारच्या नंबर प्लेटसाठी इतके रुपये खर्च केले, जितक्या रुपयात टोयोटा फॉर्च्युनर मिळाली असती.
केरळमधील लिटमस सेवन सिस्टम्स कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ वेणू गोपालकृष्णन यांनी त्यांच्या 4 कोटी रुपयांच्या लॅम्बोर्गिनी उरुस सुपर कारसाठी '07 DG 0007' हा नंबर खरेदी केला आहे. या कारच्या नंबरप्लेटसाठी त्यांनी तब्बल 46 लाख रुपये खर्च केले. हा नंबर केरळमध्ये लिलावात येणारा आतापर्यंतचा सर्वात महागडा नंबर बनला आहे. 7 एप्रिल रोजी केरळ मोटार वाहन विभागाने ऑनलाइन लिलाव आयोजित केला होता.
मूळ किंमत फक्त 3 हजार रुपये होतीविशेष म्हणजे, या नंबर प्लेटसाठी लिलावात फक्त 3 हजार रुपये मूळ किंमत होती. कोणी विचारही केला नव्हता की, या नंबरप्लेटसाठी 46 लाख रुपयांची बोली लागेल. या लिलावात एकूण 5 खरेदीदार बोली लावत होते. शेवटच्या क्षणी दोन खरेदीदारांमध्ये स्पर्धा रंगली अन् शेवटी वेणू गोपालकृष्णन यांनी बोली जिंकली. वेणू गोपालकृष्णन यांनी आपल्या इंस्टाग्रामवर पोस्टद्वारे ही माहिती दिली. त्यांनी स्वतःला त्यांच्या नवीन लाईम ग्रीन लॅम्बोर्गिनी उरुसची डिलिव्हरी घेताना दाखवले. वेणू म्हणाले की, केरळमध्ये अशा प्रकारची ही पहिलीच कार आहे.