मुंबईत पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. शिवाय, मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल देखील उशिराने धावत असल्याने प्रवाशांनी आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी डोक्याला हात मारला. मात्र, त्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पाहायला मिळाला, ज्यात नागरिकांना पहिल्याच पावसात कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले? हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दरम्यान, सोमवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले. मुसळधार पावसामुळे रुळांवर पाणी साचल्याने मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल गाड्या नियोजित वेळेपेक्षा ५ ते १० मिनिटे उशिराने धावल्या. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
मुंबईसह पाच जिल्ह्यांना रेड अलर्टहवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पुढील ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. दरम्यान, २७ आणि २८ मेला रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांना २७ मेला रेड अलर्ट देण्यात आला. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले.