सामान्यपणे एखादा आयएएस अधिकारी म्हटला की, गाड्यांचा लवाजमा, सुरक्षा रक्षक असं चित्र बघायला मिळतं. पण सध्या सोशल मीडियात जमिनीशी नाळ जुळलेल्या एका आयएएस अधिकाऱ्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. हा फोटो आहे मेघालयाचे आयएएस अधिकारी राम सिंह यांचा. सोशल मीडियात त्यांची चर्चा रंगण्याचं कारण म्हणजे ते १० किलोमीटर पायी चालत जाऊन भाजी खरेदी करतात. एका इतक्या मोठ्या पदावर असलेल्या अधिकाऱ्याने अशाप्रकारे वेगळेपण जपणं हे लोकांसाठी फारच आश्चर्याचं ठरत आहे. राम सिंह हे मेघालयातील वेस्ट गारो हिल्समध्ये डेप्युटी कमिश्नर आहेत.
२४ सप्टेंबरला Oxomiya Jiyori नावाच्या यूजरने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली. यात सांगण्यात आलं की, राम सिंह हे दर आठवड्याला हिरव्या भाज्या खरेदी करण्यासाठी १० किमोमीटर पायी चालत जातात. ते स्थानिकांकडून २० ते २५ किलो भाजी खरेदी करतात.
राम सिंह यांचे फोटो फेसबुकवरही शेअर करण्यात आले आहेत. त्यांनी पाठीवर एक बांबूची मोठी टोपली घेतली आहे. ज्यात ते भाज्या आणतात. देशाला प्लॅस्टिक फ्रि करण्यासाठी ते याद्वारे संदेशही देत आहेत. ही बांबूची टोपली सुद्धा स्थानिक लोकांकडून तयार करण्यात आली आहे.
EastMojo नावाच्या एका वेबसाइटला त्यांनी सांगितले की, लोकांनी त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी म्हणून ते पायी चालत भाजी घ्यायला जातात. याने ट्रॅफिक जॅम कमी होईल. लोकांनी प्लॅस्टिकचा वापरही टाळावा. ते म्हणाले की, ते गेल्या सहा महिन्यांपासून अशाप्रकारे पायी भाजी घ्यायला जातात.
राम सिंह यांचं एक इन्स्टाग्राम पेज असून त्यावर दिसून येतं की ते फिटनेसबाबत किती जागरूक आहेत. खरंतर असे आणखी जागरूक अधिकारी देशाला मिळाले तर लोकांचे अच्छे दिन नक्कीच येतील.