मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील जावासिया गावात एक अनोखी आणि भावुक करणारी घटना समोर आली आहे. अंबालाल प्रजापती यांनी त्यांचा जवळचा मित्र सोहनलाल जैन यांची शेवटची इच्छा कशी पूर्ण केली ते पाहून गावकरीही भावूक झाले. तीन वर्षांपूर्वी सोहनलाल जैन यांना कॅन्सर झाला होता. त्यांच्या आजारपणात त्यांनी त्यांचा जवळचा मित्र अंबालाल यांना एक पत्र लिहिलं होतं.
या पत्रामध्ये मित्राने स्पष्ट लिहिलं होतं की, "जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा माझ्या अंत्ययात्रेमध्ये रडू नका. शांतता नसावी. माझी अंत्ययात्रा ढोल वाजवून वाजत गाजत काढावी. मला आनंदाने हसत हसत निरोप द्या." सोहनलाल यांचं हे पत्र त्यांच्या मृत्यूनंतर सर्वांसमोर आलं. अंबालाल यांनी पत्र वाचताच त्यांनी त्यांच्या मित्राची शेवटची इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.
सोहनलाल यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीय ढसाढसा रडत होते, गाव रडलं. पण अंबालाल यांनी मित्राची इच्छा पूर्ण केली. त्यामुळे जेव्हा सोहनलाल यांची अंत्ययात्रा काढली गेली तेव्हा रडण्याचा आवाज येत नव्हता. त्याऐवजी ढोल वाजत होते, बँडबाजा वाजत होता. लोक नाचत होते आणि सोहनलाल यांना आनंदाने निरोप देत होते. अंबालाल स्वतः सर्वांच्या आधी नाचत चालले होते. "सोहनलाल माझा सर्वात चांगला मित्र होता. त्याला जे हवं होतं तेच मी केलं. आज मी रडत नाहीय, कारण त्याला मी रडू नये असं वाटत होतं" असं अंबालाल यांनी म्हटलं.
गावातील हे दृश्य खूप वेगळं आणि मनाला स्पर्शून जाणारं होतं. लोक म्हणत होते की एखाद्याच्या शेवटच्या प्रवासात पहिल्यांदाच असं आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते, परंतु सर्वांनी सोहनलाल यांच्याप्रमाणे चेहऱ्यावर हास्य ठेवून अंत्यसंस्कार केले. एका मित्राने आपल्या प्रिय मित्राची शेवटची इच्छा पूर्ण प्रामाणिकपणाने पूर्ण केल्याचं हे उदाहरण आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.