सोशल मीडियावर विविध व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. असाच एक हृदयस्पर्शी व्हिडीओ आता तुफान व्हायरल होत आहे. केरळमधील कोची येथे राहणाऱ्या अश्विनने १४ वर्षांनंतर त्याच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. त्याने त्याच्या वडिलांना आश्चर्याचा मोठा धक्का देत रॉयल एनफील्ड बुलेट भेट दिली. जेव्हा वडिलांना बुलेटची चावी देण्यात आली तेव्हा त्यांना वाटलं की, ही बुलेट अश्विनची आहे. पण मुलगा हसला आणि म्हणाला, "ही माझी नाही तर तुमची बुलेट आहे पप्पा..." हा भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला.
अश्विनने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. "१४ वर्षांपूर्वी, पप्पांनी म्हणाले होते की, त्यांना बुलेट खरेदी करायची आहे. अनेकवेळा संधी आली, पण त्यांनी कधीही स्वतःला प्राधान्य दिलं नाही. आज मी त्यांनी तीच गोष्ट दिली जी त्यांना नेहमीच हवी होती पण कधीही घेऊ शकले नाहीत. हे तुमच्यासाठी आहे" असं अश्विनने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
व्हिडिओमध्ये असं दिसून येतं की, अश्विनचे वडील बाईकची चावी घेताना आश्चर्यचकित होतात. जेव्हा त्यांना समजतं की हे गिफ्ट त्यांच्यासाठी आहे, तेव्हा ते आणि त्यांची पत्नी दोघेही खूप भावनिक होतात आणि त्यांच्या मुलाला मिठी मारतात. हा क्षण पाहून लोकांचेही डोळे पाणावले आहेत. त्यांना मुलाचं खूप कौतुक वाटतं, आईवडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात.
आतापर्यंत ७० लाखांहून अधिक वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे आणि हजारो लोक कमेंट करत आहेत. एका युजरने अशी मुलं आशीर्वादापेक्षा कमी नाहीत. आजच्या पिढीत अशी आणखी मुलं असती तर बरं झालं असतं असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने समजात अजुनही अशी काही मुलं आहेत जी आई-वडिलांचा जास्त विचार करतात असं म्हटलं आहे. सोशल मीडियावर सध्या अश्विनचं भरभरून कौतुक केलं जात आहे.