Suhani Shah Viral Video in Australia : भारतीय मेंटलिस्ट सुहानी शाह विविध कारणांनी चर्चेत असते. 'मनातलं ओळखणारी' अशी ओळख असलेली सुहानी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अलिकडेच, तिने एका ऑस्ट्रेलियन टीव्ही शो मध्ये आपली प्रतिभा दाखवली. तिची प्रतिभा पाहून शो चे होस्ट आणि प्रेक्षकही थक्क झाले. शोमध्ये, सुहानीने अँकरच्या क्रशचा अचूक अंदाज लावला. तसेच कोणत्याही हॅकिंग किंवा इतर डिव्हाईसशिवाय दुसऱ्या होस्टच्या फोनचा पासकोड देखील सांगितला. यानंतर, सोशल मीडियावर तिचे खूपच कौतुक होत आहे आणि लोक तिच्या अद्वितीय प्रतिभेबद्दल चर्चा करताना दिसत आहेत.
एका ऑस्ट्रेलियन टीव्ही शोमधील व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सुहानी शाह प्रथम एका होस्टला त्याच्या कुटुंबाचा भाग नसलेल्या व्यक्तीचा विचार करण्यास सांगते. थोड्या वेळाने त्याच्या चेहऱ्याचे हावभाव पाहून सुहानी त्या व्यक्तीच्या मनात असलेले नाव अचूक सांगते. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटते. यानंतर, ती दुसऱ्या प्रेझेंटरला फोनचा पासकोड मनात धरायला सांगते. त्यानंतर ती हॅकिंग डिव्हाईस किंवा कुठल्याही इतर व्यक्तीचा आधार न घेता अचूकपणे त्याचा पासकोड सांगते. या लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान शो चे होस्ट पूर्णपणे आश्चर्यचकित होतात.
सुहानी शाह सोशल मीडियावर 'ट्रेंडिंग'
सुहानी शाहच्या या जादुई कामगिरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोक तिच्या टॅलेंटचं कौतुक करत आहेत. एका युजरने लिहिलंय की, अखेर सुहानी जागतिक ओळख मिळत आहे, ज्यासाठी ती नक्कीच पात्र होती. दुसऱ्या युजरने लिहिले की, एखाद्या भारतीयाला परदेशी नावाचा अंदाज लावणे कठीण आहे, पण सुहानीने ते देखील करून दाखवले.