जगामध्ये अशक्य अशी कोणतीचं गोष्ट नसते. जर एखादी गोष्ट करायचीच, असे आपण मनाशी निश्चित केले तर ती साध्य करण्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. अशी अनेक उदाहरणंदेखील आपण पाहतो. असंच आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. अमेरिकेतील एका 25 वर्षीय तरूणीने सिद्ध केलं आहे की, कोणतीच गोष्ट अशक्य नसते. अमेरिकेत रहाणाऱ्या एंबर राच्डी महिलेनं असं काही केलं आहे की, ज्यामुळे तुम्हालाही आश्चर्य वाटेल. जाणून घेऊयात तरूणीच्या या कारनाम्याबाबत...
आपल्या कुटुंबासोबत अमेरिकेमध्ये राहणाऱ्या अंबर राच्डीचं वजन 300 किलो होतं. पण आज तिनं जे केलं आहे त्यामुळे तुम्ही कदाचितचं तिला ओळखू शकाल. एकेकाळी अंबर आपल्या लठ्ठपणामुळे खूप त्रासलेली होती. तिचं वजन मर्यादेपेक्षा जास्त वाढलेलं होतं. एके दिवशी वैतागून तिनं वजन कमी करण्याचा निश्चय केला. आणि त्यांनंतर जे झालं त्यावर तुम्ही विश्वासच ठेवू शकणार नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मानसिक परिस्थिती बिघडल्यामुळे अंबर दिवसभर काहीना काही खात राहत होती. जेव्हा तिनं स्वतःला खाण्यापासून रोकण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती प्रचंड अस्वस्थ होत असे. तिच्या कुटुंबियांसोबतच तिच्या या परिस्थितीमुळे तिचा बॉयफ्रेंडही त्रस्त होता. तो हळूहळू तिच्यापासून लांब जात होता. काही दिवसांनंतर अंबरला ही गोष्ट लक्षात आली आणि तिनं आपलं वजन कमी करण्याचा निश्चय केला. फक्त एवढंचं कारण नाही तर तिच्या या वाढलेल्या वजनामुळे तिला चालण्या फिरण्यासही त्रास होत होता. त्याचप्रमाणे सतत एकाच जागी बसून राहिल्यामुळे तिला आरोग्याच्या अनेक समस्या आणि इन्फेक्शनसारख्या समस्यांचा सामना करावा लागत होता.
अंबरने वजन घटवण्यासाठी मेडिकलचा सहारा घेतला. त्यासाठी तिला विमानाने होस्टन शहरात घेऊन जाण्यात आलं होतं. तिथे डॉक्टरांनी सर्जरी करण्याआधी तिच्या डाएटमध्ये बदल करून तिचं 10 किलो वजन घटवलं. त्यानंतर सर्जरी करून तिचं 50 किलो वजन घटवण्यात आलं. त्यानंतर अनेक थिअरपी आणि एक्सरसाइजचा वापर करून अंबरने आणखी 130 किलो वजन घटवलं. सध्या तिचं वजन 70 किलो आहे. वजन घटवल्यानंतर ज्यावेळी अंबरला तिच्या बॉयफ्रेंडने पाहिलं त्यावेळी त्याला धक्का बसला. एवढंच नव्हे तर तिचे नातेवाईक तर तिला ओळखूही शकले नाहीत.