महाकुंभमध्ये जोरदार चर्चेत आलेल्या हर्ष रिछारियाने आता आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत तिने तिला होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितलं. ती ढसाढसा रडत आहे. "काही धर्मविरोधी लोक AI वापरून माझे व्हिडीओ एडिट करून माझी बदनामी करत आहेत. महादेवाने मला हिंमत दिली आहे, तोपर्यंत लढेन. मी याचा सामना करेन."
"ज्या दिवशी मी तुटून पडेन, त्या दिवशी मी सर्वांची नावं लिहून आत्महत्या करेन" असं हर्षाने म्हटलं आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर २ मिनिटं १३ सेकंदाचा व्हिडीओ शेअर केला आहे. "मी महाकुंभात प्रतिज्ञा घेतली होती की, मी हिंदुत्वासाठी काम करेन. मी तरुणांना जागरूक करेन. मी धर्म आणि संस्कृतीच्या प्रगतीसाठी काम करेन, पण काही धर्मविरोधी लोक मला रात्रंदिवस पुढे जाण्यापासून रोखत आहेत."
"मला खूप मेसेज आणि मेल येत आहेत. आधी माझा जुना व्हिडीओ व्हायरल झाला. ओळखीच्या लोकांनीच हे केलं आहे. व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे की, ही काय होती आणि आता ती साध्वी कशी बनू शकते? मी तुम्हाला सांगते की, मी साध्वी आहे असं मी कधीही म्हटलं नाही. माझं एक प्रोफेशन होतं ज्यामध्ये मी काम करायची. मग हे लोक एआयद्वारे बनावट व्हिडीओ एडिट करून घेण्याइतपत खाली उतरले आहेत."
"गेल्या १०-१५ दिवसांपासून व्हिडीओ व्हायरल होत आहे. दररोज २५-३० मेसेज येत आहेत. लोक म्हणत आहेत की, तुमचे फेक व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत. तुमची बदनामी होत आहे. असं करणाऱ्यांवर कारवाई करा. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे."
"जोपर्यंत माझा श्वास सुरू आहे तोपर्यंत मी सनातन धर्मासाठी काम करेन, पण काही लोक मुलीची प्रगती होताना पाहू शकत नाहीत. माझ्याकडे त्यांची नावं आहेत. जर कोणत्याही सकाळी हर्षा रिछारियाने आत्महत्या केल्याचं कळलं तर माझ्याकडे सर्वांची नावं आहेत. मी सर्वांची नावं लिहून जाईन आणि कोणी माझ्यासोबत काय केलं हे सांगेन" असं हर्षा रिछारियाने म्हटलं आहे.