Gold in Sea Water: पृथ्वीवरील महासागरांमध्ये अमाप खजिना दडलेला आहे. वैज्ञानिकांच्या मते, समुद्राच्या पाण्यात तब्बल २ कोटी टन सोनं आहे. प्रत्येक 10 कोटी मेट्रिक टन पाण्यात सुमारे 1 ग्रॅम सोनं आढळतं. ही मात्रा अतिशय सूक्ष्म असली तरी जागतिक पातळीवर पाहता त्याची किंमत अब्जावधी डॉलर्समध्ये आहे.
वैज्ञानिकांच्या अंदाजानुसार, महासागरांमध्ये दडलेल्या सोन्याची एकूण किंमत सुमारे 2000 अब्ज डॉलर्स असू शकते. पण, प्रश्न असा आहे की, इतके सोने असूनही आपण ते काढू का शकत नाही?
समुद्रात सोनं आलं कसं?
पावसाचे पाणी आणि नद्यामधील दगडाच्या घर्षणानं सोन्याचे बारीक तुकडे होतात आणि हेच शेवटी समुद्रात पोहोचतं. समुद्रतळातील हायड्रोथर्मल व्हेंट्स खनिजे व गरम पाणी सोडतात, ज्यामुळे सोनं पाण्यात मिसळतं. समुद्री ज्वालामुखी क्रियाही या प्रक्रियेत हातभार लावतात. हजारो वर्षांपासून ही प्रक्रिया सुरू आहे आणि त्यामुळेच महासागरांमध्ये प्रचंड प्रमाणात सोनं साठलंय.
सोनं काढण्याच्या प्रयत्न
वैज्ञानिकांनी अनेकदा महासागरांमधून सोनं काढण्याचा प्रयत्न केला आहे. 1941 मध्ये इलेक्ट्रो-केमिकल पद्धत सुचवली गेली होती, पण त्याची किंमत सोन्याच्या मूळ किमतीपेक्षा कितीतरी पट जास्त होती. त्यानंतर 2018 मध्ये एक नवीन तंत्रज्ञान समोर आलं, ज्यात एक विशेष पदार्थ पाण्यातील सोनं शोषून घेत होता. मात्र, ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर वापरणे आजही शक्य नाही.
तांत्रिक आणि आर्थिक अडचणी
समुद्राच्या प्रत्येक १ लिटर पाण्यात १ नॅनो ग्रॅमपेक्षा कमी सोनं असतं. इतकी सूक्ष्म मात्रा वेगळी करण्यासाठी अब्जावधी लिटर पाणी प्रक्रिया करावं लागेल. त्यामुळे हा उपक्रम अत्यंत कठीण व महागडा ठरतो. याच कारणामुळे सध्या समुद्रातून सोनं काढणं लाभदायक नाही.
भविष्यात शक्य होईल का?
तंत्रज्ञानाच्या प्रगतीनंतरही समुद्री पाण्यातून सोनं काढणं आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही. मात्र, भविष्यात जर नॅनो-टेक्नॉलॉजी आणि केमिकल इंजिनियरिंगमध्ये क्रांतिकारी बदल झाले, तर ही प्रक्रिया सुलभ होऊ शकते. समुद्रातून सोनं काढणं शक्य झाल्यास जागतिक सोन्याचा पुरवठा व किमतींवर मोठा परिणाम होईल. परंतु आजच्या घडीला हा विषय फक्त वैज्ञानिक संशोधन आणि कल्पनाशक्तीपुरता मर्यादित आहे.