Divya Deshmukh Emotional hug to Mother, Women's Chess World Cup Final: नागपूरच्या अवघ्या १९ वर्षांच्या लेकीने आज जग जिंकले. महाराष्ट्राची दिव्या देशमुख हिने जॉर्जियातील बटुमी येथे खेळल्या गेलेल्या २०२५ च्या FIDE विश्वचषक स्पर्धेत ३८ वर्षांच्या ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला (Koneru Humpy) पराभूत केले. दोन्ही खेळाडूंमधील सुरुवातीचे सामने अनिर्णित राहिले होते. शनिवार आणि रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात दोघींनी गुणांची बरोबरी साधली होती. त्यानंतर आज, रॅपिड राउंडमध्ये प्रथम पांढऱ्या सोंगट्यांसह दिव्याने हम्पीची बरोबरी केली. त्यानंतर निर्णायक दुसऱ्या फेरीत काळ्या सोंगट्यांसह ७५व्या चालीला कोनेरूला माघार घेण्यास भाग पाडले. महिला बुद्धिबळ विश्वचषकाचे विजेतेपद जिंकणारी दिव्या देशमुख पहिलीवहिली भारतीय ठरली. या विजयानंतर एक भावनिक प्रसंग पाहायला मिळाला.
विजय मिळाला तो क्षण...
जागतिक क्रमवारीत १८व्या स्थानी असलेल्या नागपूरच्या दिव्या देशमुख हिने अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीवर विजय मिळवला. शेवटच्या काही सेकंदात दोघीही अतिशय गंभीर भावमुद्रेत दिसल्या. त्यानंतर अखेर हम्पीने हार मानली आणि विजेतेपदाबद्दल दिव्याशी हस्तांदोलन केले.
दिव्याची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर
अवघ्या १९ वर्षांच्या दिव्या देशमुखने विजय मिळवताच पहिले आपल्या आईला घट्ट मिठी मारली. विजयाच्या आनंदामुळे दिव्या खूपच भावनिक झाल्याचे दिसून आले. त्यामुळेच दिव्याने खूप वेळ आईला मारलेली मिठी सोडलीच नाही. दिव्या आणि तिची आई दोघींनाही भरून आले. दिव्याला आनंदाश्रू अनावर झाले. ती आईच्या मिठीत भावनिक होत व्यक्त झाली. त्यानंतर दिव्याच्या आईने दिव्याला सावरले आणि शुभेच्छा दिल्या. पाहा व्हिडीओ-
दिव्याला किती बक्षीस मिळाले?
FIDE महिला विश्वचषक २०२५च्या अंतिम सामन्यातील विजेत्या दिव्या देशमुखला सुमारे ४२ लाख रुपये आणि उपविजेत्या कोनेरू हम्पीला सुमारे ३५,००० अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे ३० लाख रुपये बक्षिसे मिळणार आहेत. याशिवाय, या खेळाडूंनी अत्यंत प्रतिष्ठित 'कॅन्डिडेट्स' स्पर्धेसाठीही पात्रता मिळवली.