आजकाल ऑनलाईन फूड आणि इतर वस्तू ऑर्डर करणं अगदी नॉर्मल झालं आहे. लोक Apps वापरून घरबसल्या सर्वकाही ऑर्डर करतात. याच दरम्यान लखनौ येथील व्लॉगर आणि डिलिव्हरी बॉय रोहितने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला जो व्हायरल झाला. व्हिडीओमध्ये रोहित फूड देण्यासाठी पोहोचला आणि समोर पाहिलेल्या दृश्याने सर्वांनाच धक्का बसला. रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका भिकाऱ्याने जेवण ऑर्डर केलं होतं.
रोहित रात्री फूड देण्यासाठी रस्त्यावर गेला आणि त्याने फोनवर ग्राहकाला त्याचं लोकेशन विचारलं. ग्राहकाने सांगितलं की, तो रस्त्यावर बसला आहे. यामुळे रोहितला मोठा धक्का बसला. तो जवळ येताच त्याला रस्त्याच्या कडेला एक भिकारी बसलेला दिसला. भिकाऱ्याने रोहितला सांगितलं की, त्याने जेवण ऑर्डर केलं आहे. भिकाऱ्याकडे दोन मोबाईल असलेले पाहून रोहितला आश्चर्याचा धक्काच बसला. यावर भिकाऱ्याने विचारलं की, "तुम्हाला इतकं आश्चर्य का वाटलं? मी जेवण ऑर्डर करून जेवू शकत नाही का?"
भिकाऱ्याने ऑनलाईन पैसे देण्याचा प्रयत्न केला, पण नेटवर्क नसल्यामुळे नंतर त्याने रोख पैसे दिले. रोहितने सांगितलं की, त्याच्याकडे पैसे नाहीत, म्हणून भिकाऱ्याने उर्वरित पैसे टिप म्हणून ठेवावेत असंही म्हटलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. भिकारी किंवा सामान्य ग्राहक, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करू शकतात हे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
रोहितचा व्हिडीओ @rohitvlogster या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला होता आणि तो ५३ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. लोकांनी त्यावर कमेंट केल्या. काहींनी म्हटलं की हा व्हिडीओ स्क्रिप्टेड असू शकतो, तर काहींनी हे देशाच्या प्रगतीचं लक्षण असल्याचं म्हटलं आहे. सध्या या व्हिडीओची जोरदार चर्चा रंगली आहे.