उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री लखनौहून बरेलीला जाणाऱ्या ट्रेनमधून अचानक ५०० आणि १०० रुपयांच्या नोटांचा पाऊस पडू लागला. हे पाहताच लोकांनी मोठी गर्दी केली. रात्र असल्याने लोकांनी त्यांच्या मोबाईल टॉर्चच्या सहाय्याने नोटा शोधल्या. काही वेळातच रेल्वे रुळांवर झुंबड उडाली, जी एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखी होती.
ट्रेनमधील एका व्यक्तीने नोटांनी भरलेली मोठी बॅग खिडकीतून हवेत फेकण्यास सुरुवात केली असं सांगितलं जात आहे. मात्र फरीदपूर स्टेशनजवळ राहणाऱ्या रहिवाशांचा दावा आहे की, अचानक आकाशातून पैशांचा पाऊस पडायला लागला. सुरुवातीला लोक गोंधळले, परंतु जवळून पाहिल्यावर त्यांना लक्षात आलं की, नोटा १०० आणि ५०० च्या आहेत. हे पाहून सर्वजण त्या नोटा घेण्यासाठी रेल्वे रुळांवर धावले.
लोकांनी अंधारात मोबाईलच्या टॉर्चचा वापर करून नोटा शोधल्या. काहींनी तर घरातून टॉर्च आणल्या. नोटा खऱ्या आहेत की खोट्या याची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरही जोरदार व्हायरल होत आहे. रेल्वे रुळांवर विखुरलेल्या नोटा उचलण्यासाठी लोक मोठी गर्दी करत असल्याचं स्पष्टपणे दिसून येतं. व्हायरल व्हिडिओमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.
फरीदपूरचे निरीक्षक राधेश्याम यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना या घटनेची कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. त्यांना सतत लोकांचे फोन येत आहेत आणि ते सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. योग्य माहिती उपलब्ध होताच कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं. परिसरात सध्या याच घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.