प्रेमसंबंध असोत की विवाह, नातं टिकवण्यासाठी प्रामाणिकपणा हा महत्त्वाचा असतो. पण काहीजण मात्र एका नात्यात समाधानी राहत नाहीत. अशाच एका तरुणाने एकीकडे प्रेमसंबंध ठेवत दुसरीकडे लग्न करून दोन्ही मुलींच्या आयुष्याशी खेळ केला. मात्र, या "डबल शौहर"ची पोलखोल अशी काही झाली की, संपूर्ण गावात त्याचीच चर्चा सुरू झाली आहे.
प्रेमाचं नाटक, लग्नाचं सत्य लपवून...डिडौली कोतवाली परिसरातील एका गावातील हा प्रकार आहे. एका युवकाचे दीर्घकाळापासून एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. दोघं त्यांच्या लग्नाची स्वप्नं बघत होते. पण अचानक घरच्यांनी तरुणाचे लग्न दुसऱ्याच मुलीसोबत लावून दिलं. विशेष म्हणजे, या तरुणाने आपल्या प्रेयसीला ही गोष्ट सांगितलीच नाही.
आपल्या लग्नाची गोष्ट लपवून तरुण सतत प्रेयसीला खोटी आश्वासने देत राहिला. तो तिला म्हणायचा की, "मी तुझ्याशीच लग्न करणार आहे." दुसरीकडे, नव्याने लग्न केलेल्या पत्नीसोबत आदर्श नवरा बनून राहायचा. इतकंच नव्हे, तर प्रेयसीला त्याने गावाबाहेर एक भाड्याचं घरसुद्धा घेऊन दिलं.
जगत होता दोन लोकांचं आयुष्य...
हा तरुण इतका शिताफीने वागत होता की, दिवसा एकीकडे प्रेमिकेचा वेळ, रात्री घरी पत्नीसोबत अशी त्याची डबल शिफ्ट सुरू होती. पण काही कारणांमुळे सलग दोन दिवस तो प्रेमिकेच्या घरी गेला नाही, आणि ती साशंक झाली. मग काय तिने थेट त्याच्या गावात धडक मारली.
बायको आणि प्रेयसी आमनेसामने!
गावात पोहोचताच प्रेमिकेच्या डोळ्यांसमोर त्याचं सत्य आलं. तिच्या समोर त्याची बायको उभी होती. लगेचच दोघींमध्ये वादावादी सुरू झाली, आणि काही वेळातच गोष्ट हाणामारीपर्यंत पोहोचली. गावकरी हे सगळं पाहत होते. शेवटी, जमलेल्या लोकांपैकी एकाने पोलिसांना फोन केला.
पोलिसांनी काय केलं?
पोलिसांनी तिन्ही व्यक्तींना थेट ठाण्यात बोलावून घेतलं. तिथे त्यांना समजावून सांगितलं आणि मोठ्या मेहनतीने त्यांच्यात समेट घडवून आणला. तिघांनाही वेगळ्या दिशेने पाठवण्यात आलं. मात्र, गावात आता या प्रेम त्रिकोणाची आता मोठी चर्चा रंगली आहे.
या सर्व गोंधळात तरुणाचं म्हणणं होतं की, मी दोघींचाही खर्च उचलू शकतो. पण, त्याची पत्नी मात्र कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्या महिलेला स्वीकारण्यास तयार झाली नाही. सध्या या प्रकरणात कुठलीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे. जर, संबंधितांकडून तक्रार मिळाली, तर कायदेशीर कारवाई केली जाईल.