नवी दिल्ली - ही कहाणी आहे राजधानी दिल्लीपासून जवळच असलेल्या गुरुग्राम येथील २५ वर्षीय टेक प्रोफेशनल युवकाची...तो महिन्याला ७० हजाराहून अधिक कमावतो. दर महिना त्याला ७० हजार इन हँड सॅलरी मिळते तरीही त्याच्याकडे पैसे शिल्लक राहत नाहीत. सोशल मीडियावरील रेडिटवर या युवकाने त्याचा अनुभव शेअर केला आहे. आयुष्यात आर्थिक स्थिरता कशी आणायची आणि पैसे कसे वाचवू असा सल्ला युवकाने सोशल मीडियावर युझरला विचारला आहे.
बऱ्याचदा लहान वयात नोकरी लागते, नवीन नोकरी लागल्यानंतर त्यातून मिळणारे पैसे सांभाळणे कठीण होते. काही लोक असे असतात ज्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी असते. ते EMI मॅनेज करत असतात. त्याशिवाय आयुष्यातील मोठं ध्येर्य गाठण्यासाठी बचतही करतात. लवकरात लवकर आर्थिक सुबकता मिळावी असं त्याला वाटत असते परंतु वाढणारा खर्च, जबाबदारीचं ओझं याचा सामना खऱ्या आयुष्यात त्यांना करावा लागतो.
काय आहे युवकाची कहाणी?
२५ वर्षीय टेक प्रोफेशनल युवक २०२१ मध्ये कॉलेजमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर अवघ्या २४ हजाराच्या पगारावर नोकरीला लागला. मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर ४ वर्षात त्याची इन हँड सॅलरी दर महिना ७० हजार इतकी झाली. गुरुग्रामसारख्या महागडं शहर असल्याने तिथे भाड्याच्या खोलीत राहण्यासाठी त्याला जास्त पैसे मोजावे लागतात. महिन्याच्या अखेरपर्यंत त्याच्याकडे बचतीसाठी पैसे शिल्लक राहत नाहीत. तो त्याच्या कुटुंबाचा आधार आहे. त्यामुळे त्याला घरीही पैसे पाठवावे लागतात. इतकेच नाही तर वडिलांनी २ लाखांचे कर्ज घेतले आहे त्याच्या हफ्त्यासाठी दर महिना घरी २० हजार पाठवतो. त्याच्या घराचे भाडे १० हजार इतके आहे. त्याशिवाय EMI, SIP, क्रेडिट कार्ड बिलही द्यायचे असतात. त्याच्यानंतर त्याच्याकडे पैसे राहत नाही.
घरच्यांनी लग्नासाठी टाकला दबाव
युवकानं २८-२९ वयात लग्न करावे अशी त्याच्या आई वडिलांची इच्छा आहे. त्याच्या आजूबाजूचे लोक आर्थिकदृष्ट्या समृद्ध होत आहेत मात्र युवक अडचणीतून जीवन जगत आहे. तो एका स्टार्टअपमध्ये उत्पादन आणि ऑपरेशन्समध्ये काम करतो. चांगल्या पगारासाठी नोकरी बदलण्याचा प्रयत्न करतो. पण सततचा दबाव आणि अपराधीपणामुळे तो अडकल्यासारखा वाटतो. शिवाय आता तो कमाई करत असल्याने त्याचे कुटुंब त्याला लवकर लग्न करावे असा आग्रह धरत आहेत. मात्र कुटुंबाला कर्जातून बाहेर काढावे, कमीत कमी १० लाख रूपये आपत्कालीन फंड असावा, हेल्थ इन्शुरन्सची एक पॉलिसी हवी अशी युवकाची इच्छा आहे.
युझर्सने काय दिला सल्ला?
एका युझर्सने साधू जीवन जगण्याचा सल्ला युवकाला दिला. ज्यामध्ये सहा महिने बाहेर खाणे बंद करणे, क्रेडिट कार्ड टाळणे, प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवणे आणि Fear of Missing Out टाळण्यासाठी इंस्टाग्राम सारखे सोशल मीडिया अॅप्स डिलीट करणे समाविष्ट होते असं त्यांनी सांगितले. इतरांनी युवकाला SIP बंद करण्याचा, ताबडतोब आरोग्य विमा खरेदी करण्याचा आणि उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांचे कौशल्य सुधारण्याचा सल्ला दिला. काहींनी व्यावहारिक आर्थिक टिप्स देखील शेअर केल्या, जसे की किमान सहा महिन्यांच्या खर्चाइतका आपत्कालीन निधी तयार करणे, मासिक बजेट तयार करणे आणि आवेगपूर्ण खर्च टाळण्यासाठी क्रेडिट कार्ड सोडून देणे. काहींनी म्युच्युअल फंड नफा कमवत असल्यास, विद्यमान कर्जे परत करण्यासाठी विकण्याचा आणि नंतर पुन्हा गुंतवणूक सुरू करण्याचा सल्ला दिला.