पंचवीस कोटीच्या जिल्हा परिषद अर्थसंकल्पाला मंजुरी
By Admin | Updated: February 27, 2015 23:19 IST2015-02-27T22:55:37+5:302015-02-27T23:19:03+5:30
शिक्षण विभागासाठी सन २०१४-१५ मध्ये बांधकाम विभागासाठी ३,३४,८०,००० इतकी सुधारित तरतूद करण्यात आली असून सन २०१५-१६ चे मूळ अंदाजपत्रकात १ कोटी ४० लाख रुपयांची तरतूद

पंचवीस कोटीच्या जिल्हा परिषद अर्थसंकल्पाला मंजुरी
रत्नागिरी : जिल्हा परिषदेचे स्वत:च्या उत्पन्नाचे २५ कोटी ३१ लाख २१ हजार ८५१ रुपयांचे सन २०१४ - १५ सुधारित अंदाजपत्रक व सन २०१५ - १६ च्या मूळ अंदाजपत्रकाला आज शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या इतिहासात आजचे सर्वात मोठे बजेट असल्याचा उल्लेख करीत वित्त समिती सभापती ऐश्वर्या घोसाळकर यांनी सभागृहात सादर केले. जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत हे बजेट सभापती घोसाळकर यांनी मांडले. या बजेटमध्ये १ एप्रिल २०१४ ची आरंभीची शिल्लक ८,१४,४३,८९० आहे. सन २०१४ - १५ ची संभाव्य महसूली जमा रु. १२,९६,६४,८९० अधिक भांडवली जमा ३,२०,१३,००० व वित्तप्रेषण १ कोटी रुपये असे एकूण महसुली, भांडवली व वित्त पे्रषण मिळून रक्कम २५,३१,२१,८५१ महसुली खर्चाचे अंदाजपत्रक वित्त विभागाकडून तयार करण्यात आले.
शासनाच्या धोरणाप्रमाणे जिल्हा परिषदेच्या ठराविक उत्पन्नाच्या २० टक्के मागासवर्गीयांच्या कल्याणकारी योजनांसाठी ४,४७,५४,७१६ इतकी तरतूद करण्यात आली आहे. तसेच पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्ती व देखभाल निधीसाठी २० टक्के रक्कम मागील अनुशेषासह २,८२,३९,५८८ रुपये तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांसाठी जिल्हा परिषदेच्या ठरावितक उत्पन्नाच्या १० टक्के रक्कम मागील अनुंशेषासह १,४१,८४,१०९ रुपये उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. जिल्हा परिषदेच्या स्वत:च्या उत्पन्नाच्या ३ टक्के निधी अपंग व्यक्तींच्या कल्याण व पुनर्वसनाकरिता सन २०११ - १२ पासूनच्या अनुशेषासह रक्कम ७१,९०,४५७ इतकी तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
शिक्षण विभागासाठी सन २०१४-१५ मध्ये बांधकाम विभागासाठी ३,३४,८०,००० इतकी सुधारित तरतूद करण्यात आली असून सन २०१५-१६ चे मूळ अंदाजपत्रकात १ कोटी ४० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
आरोग्य विभागासाठी सहा वैद्यकीय लेखाशीर्षाखाली सुधारित तरतूद ७ लाख २० हजार रुपये करण्यात आली आहे. सन २०१५-१६ चे मूळ अंदाजपत्रकात ७ लाख २० हजार रूपये तरतूद करण्यात आली आहे. कृषी विभागासाठी मागील वर्षी ४८ लाख रुपयांची तरतूद होती. यावर्षी ती वाढवून १ कोटी ४९ लाख रुपये करण्यात आली आहे. समाजकल्याण विभागासाठी सन २०१४ - १५ च्या सुधारित अंदाजपत्रकात अनुशेषासह रक्कम ४, ४७, ५४, ७१६ रुपये तरतूद ठेवण्यात आली आहे. तर सन २०१५ - १६ चे मूळ अंदाजपत्रकात १ कोटी ३९ लाख २०० रुपये एवढी तरतूद करण्यता आली आहे.
पशुसंवर्धन विभागासाठी सन २०१४ - १५ साठी सुधारित तरतूद ९३ लाख ७० हजार रुपये तर सन २०१५-१६ चे मूळ अंदाजपत्रकाकत ४२ लाख रुपयांची तरतूद करण्यता आली आहे. महिला व बालकल्याण विभागासाठी सन २०१५ - १६ च्या मूळ अंदाजपत्रकात ६९ लाख ५० हजार १० रुपये तरतूद करण्यात आली. हे अंदाजपत्रक सादर होण्यासाठी काही सदस्यांना त्याची प्रत मिळालेली नसल्याने विरोधी पक्षनेते अजय बिरवटकर यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. बेजबाबदारपणाबद्दल संबंधितांवर कारवाई करण्याचा निर्णय सदस्या रचना महाडिक यांच्या मागणीवरुन घेण्यात आला. या चर्चा करताना उदय बने यांनी जिल्हा परिषदेच्या इतिहासातील मोठे आणि चांगले अंदाजपत्रक असल्याचा उल्लेख करुन तरतूदी सुचविल्या. अंदाजपत्रकामध्ये बदल करण्याचे अधिकार अध्यक्षांना देण्यात यावे, असा ठराव बने यांनी मांडला. त्याला मंजुरी देण्यात आली. (शहर वार्ताहर)