माजगावच्या युवकाचा बुडून मृत्यू
By Admin | Updated: June 1, 2015 23:52 IST2015-06-01T23:49:58+5:302015-06-01T23:52:20+5:30
माडखोल धरणातील घटना : मृतदेह शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

माजगावच्या युवकाचा बुडून मृत्यू
सावंतवाडी : माडखोल धरणावर सहलीसाठी गेलेल्या स्टीव्हन फ्रान्सिस फर्नांडिस (वय १७, रा. माजगाव-गरड) या युवकाचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. स्टीव्हनच्या मृतदेहाचा उशिरापर्यंत शोध घेण्यात येत होता; पण तो सापडला नाही. रात्री पाणबुड्या मागवून त्याचा शोध घेतला जाणार आहे.
माकवेल कॉजमा सोज यांच्यासह १५ ते १६ जण सोमवारी माडखोल धरण परिसरात सहलीसाठी गेले होते. दुपारच्या सुमारास स्टीव्हन व त्याचे अन्य दोन मित्र कार घेऊन माडखोल धरणात आले. काही वेळाने स्टीव्हन हा माडखोल धरणात उतरला. माडखोल धरण भरपूर खोल आहे. पुढे जाऊ नको म्हणत असतानाच स्टीव्हन हा काही क्षणातच ‘वाचवा वाचवा’ करीत ओरडू लागला आणि अचानक दिसेनासा झाला. त्याचा दुपारी दीड वाजल्यापासून पाण्यात शोध घेण्यात आला, सांगेली येथील बाबल आल्मेडा यांच्या टीमनेही शर्थीचे प्रयत्न केले. नातेवाइकांनी उशिरा सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधत पाणबुड्या मागविल्या. पण त्या उशिरापर्यंत आल्या नव्हत्या. सावंतवाडी पोलीस ठाण्यात सोज यांनी तक्रार दिली आहे. (प्रतिनिधी)