धामापूर येथे दुचाकी अपघातात युवक ठार
By Admin | Updated: July 27, 2014 00:40 IST2014-07-27T00:40:37+5:302014-07-27T00:40:54+5:30
मोटार-सायकलचा अपघात

धामापूर येथे दुचाकी अपघातात युवक ठार
चौके : मालवण- कुडाळ मार्गावरील धामापूर गवळदेव स्टॉपनजीक कासारटाका येथून रात्री उशिरा घरी परतत असताना अवघड वळणावर मोटार-सायकलचा अपघात झाल्याने युवकाचा मृत्यू झाला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, धामापूर कासारटाका येथे शुक्रवारी रात्री वायंगवडे कुळकरवाडी येथील नितीन सदानंद परब (वय २९) हा युवक आपल्या मित्राबरोबर कासारटाका येथे गेला होता. त्याच्यासमवेत सचिन परब, सचिन सुद्रिक, संदेश परब, गणपत परब हे मित्रही होते. पार्टी झाल्यानंतर तेथून परतत असताना नितीन परब हा बजाज डिस्कव्हर (एम. एच. ०४, सी एक्स ९७१८) मोटारसायकल घेऊन वेगात निघाला असताना धामापूर गवळदेव स्टॉपनजीक अवघड वळणावर रात्री २.४५ वाजता मोटारसायकलवरील ताबा सुटून मोटारसायकल रस्ता सोडून खोल गटारात उलटली. यात तो खाली पडून गंभीर जखमी झाला. सहकाऱ्यांनी त्याला बाहेर काढून कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी नेले असता सकाळी ५ वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नितीन हा गवंडी काम करत होता. त्याच्या पश्चात दोन भाऊ, तीन बहिणी आणि आई-वडील असा परिवार आहे. अपघाताचे वृत्त धामापूर पोलीस पाटील नामदेव चव्हाण यांनी पोलिसांना दिले. (वार्ताहर)