झाडाची फांदी पडून युवक जखमी
By Admin | Updated: September 19, 2015 23:47 IST2015-09-19T23:47:08+5:302015-09-19T23:47:22+5:30
वेंगुर्ले भटवाडीतील घटना : गंभीर असल्याने गोवा बांबुळीला हलविले

झाडाची फांदी पडून युवक जखमी
वेंगुर्ले : आंब्याची फांदी चालत्या दुचाकी वाहनावर पडून वेंगुर्ले-भटवाडी येथील मनोज गुरुनाथ कळेकर (२१) हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी कॅम्प भागात रात्री १0 वाजण्याच्या सुमारास घडली.
वेंगुर्ले-भटवाडी येथील आनंद कळेकर याने गणेशोत्सवादिवशी नविनच ज्युपिटर टू-व्हीलर खरेदी केली होती. आनंदचा भाऊ मनोज गुरुनाथ कळेकर हा आपल्या चुलत भाऊ मनिष मोहन कळेकर (२५) याला काल रात्री १0 वाजण्याच्या सुमारास गणेशाच्या आरत्या आटोपल्यानंतर कॅम्प परिसरात फेरफटका मारण्यासाठी ज्युपिटर गाडी घेऊन गेले होते. कॅम्प परिसरात राहणाऱ्या माजी नगराध्यक्षा सुलोचना तांडेल यांच्या घरासमोरील आंब्याची एक मोठी फांदी रस्त्यावर आली होती.
त्या फांदीला तेथून जाणाऱ्या एका डंपरची धडक बसली व ही भली मोठी फांदी डंपरच्या मागावून येणाऱ्या मनोज कळेकर या दुचाकी स्वाराच्या डोक्यावर पडली. घटना घडताच स्थानिक रहिवाशांनी धावपळ करुन मनोज कळेकर व मनिष कळेकर या दोघांना बाजूला केले. या अपघतात मनोज कळेकर हा गंभीर जखमी झाला. डोक्यातून मोठा रक्तस्त्राव येत होता. त्याला व मनिषला तत्काळ गोवा-बांबुळी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मनिषवर उपचार करुन त्याला घरी पाठविण्यात आले. तर मनोजला गंभीर दुखापत झाल्याने त्याला आय.सी.यू.मध्ये दाखल करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)