रूग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू

By Admin | Updated: January 3, 2015 00:14 IST2015-01-02T23:15:46+5:302015-01-03T00:14:39+5:30

चौकशीचे सभापतींचे आदेश : सदस्यांचा आरोग्य समिती सभेत आरोप

Younger's death due to lack of hospitalization | रूग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू

रूग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा रूग्णालयात रूग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळत नाही. आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने येथील डॉक्टरांकडून रूग्णांना सेवा देण्याचा केविलवाणा प्रकार सुरू आहे. जिल्हा रूग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे सर्पदंश झालेल्या मसुरे येथील युवकाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप सदस्य संग्राम देसाई यांनी केला. तर या मृत्यूची चौकशी व्हावी, जिल्हा रूग्णालयाच्या कामकाज, सोयी-सुविधांचा अहवाल पुढील सभेत सादर करावा, असे आदेश सभापती गुरूनाथ पेडणेकर यांनी दिले.
जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात सभापती गुरूनाथ पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली. यावेळी समिती सदस्य संग्राम प्रभूगावकर, जान्हवी सावंत, निकिता जाधव, रेश्मा जोशी, भारती चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठले, खातेप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा रूग्णालयात रूग्णांना योग्य आरोग्य सेवा मिळत नाहीत. रूग्णांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची कमतरता आहे. येथील डॉक्टरांकडून रूग्णांना आरोग्य सेवा देण्याचा केविलवाणा प्रकार सुरू आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रूग्णांना जीव गमवावा लागत आहे. मसुरे येथील तरूणाचा जिल्हा रूग्णालयाच्या हलगर्जीपणामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप सदस्य संग्राम प्रभूगावकर यांनी सभेत केला. तर या मृत्यूची चौकशी करा. जिल्हा रूग्णालयाच्या एकूणच कारभाराचा व देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांचा अहवाल पुढील सभेत सादर करण्याचे आदेश सभापती गुरूनाथ पेडणेकर यांनी दिले.
जिल्हा रूग्णालयाच्या रूग्णवाहिका बंद अवस्थेत आहेत. शववाहिका नाही, डायलेसीस सेंटर बंद पडले आहे. सीटी स्कॅन मशीन बंद आहे. मग जिल्हा रूग्णालय प्रशासन काय करते? जिल्हा रूग्णालय आरोग्य सेवा देण्यास सक्षम नाही. सद्यस्थितीत जिल्हा रूग्णालयात प्लेटलेट व रक्ताचा तुटवडा असल्याची बाब उघड करीत सदस्य प्रभूगावकर यांनी जिल्हा रूग्णालयाचा कारभार बेफिकीर सुरू असल्याचा आरोप केला.
तर जान्हवी सावंतसह सर्वच सदस्यांनी जिल्हा रूग्णालयासह उपजिल्हा रूग्णालयाच्या विविध तक्रारींचे मुद्दे उपस्थित करून जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेच्या कारभाराची चिरफाड केली तर डॉक्टरांकडून रूग्णांकडे पैशाची मागणी करणे, रूग्णांकडे दुर्लक्ष करणे, अपमानास्पद वागणूक देणे, उद्धट उत्तरे देणे, असे प्रकार घडणे म्हणजे जिल्हा रूग्णालयाची अधोगतीकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसून येत असल्याची प्रतिक्रिया यावेळी सदस्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)

Web Title: Younger's death due to lack of hospitalization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.