कणकवली : कुडाळ तालुक्यातील पोखरण येथे आपल्या मामाकडे विवाहाची निमंत्रण पत्रिका देवून भावासोबत दुचाकीवरून आंब्रड - कसवण - तळवडे मार्गे कणकवलीकडे परतत असताना दुचाकी अचानक स्लीप होऊन झालेल्या अपघातात निकीता दिलीप सावंत ( वय २८, रा. फोंडाघाट,गांगोवाडी) ही तरुणी रस्त्यावर पडली. त्याच दरम्यान आंब्रडकडे जात असलेल्या एसटी बसच्या मागील चाकाला तिच्या कंबरेचा भाग घासला. अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या निकीता हिच्यावर आंब्रड येथील दवाखान्यात प्राथमिक उपचार करून तिला अधिक उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान रविवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सायंकाळच्या सुमारास तळवडे, बौध्दवाडी येथे झाला. फेब्रुवारी महिन्यात निकीता हिचा विवाह होता. त्यामुळे ती विवाहाची निमंत्रण पत्रिका वाटत होती. या दरम्यान पोखरण येथून ती परतत असताना काळाने तिच्यावर घाला घातल्याने सावंत कुटूंबियांवर मोठा आघात झाला आहे. निकीता ही मुंबई येथे बँकेत कामाला होती. तिचा विवाह ठरल्याने ती दोन दिवसापूर्वी फोंडाघाट येथे गावी आली होती.
रविवारी सकाळी तिचा भाऊ वैभव याच्यासोबत ती पोखरण येथील मामाकडे विवाहाची निमंत्रण पत्रिका देण्यासाठी गेली होती. सायंकाळच्या सुमारास ते भाऊ- बहिण पोखरण येथून आंब्रड - कसवण - तळवडे मार्गे कणकवलीकडे येत होते. सायंकाळीच्या सुमारास तळवडे, बौध्दवाडी येथील रस्त्याच्या उतारावरून वैभव सावंत हा दुचाकी घेवून येत होता. रस्त्याच्या कडेला असलेल्या खडीच्या ग्रिडवरून दुचाकी अचानक स्लीप झाली. त्यावेळी दुचाकीच्या मागे बसलेली निकीता ही रस्त्यावर पडली. तर भाऊ वैभव हा दुसऱ्या बाजूला पडला. त्याच दरम्यान कणकवली आगाराची आंब्रडकडे जाणारी एसटी बस येत होती. बस चालक कृष्णा चंद्रकांत नेरकर ( रा. कणकवली) यांना बसच्या आरशात निकीता पडलेली दिसताच त्यांनी तत्काळ बसचा ब्रेक लावला. मात्र, बसच्या मागील चाकाला निकीता कंबरेच्या बाजूकडुन घासली गेली. तिच्या डोक्याच्या उजव्या बाजूला जोरदार मार बसल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता.यावेळी एसटी बस चालक कृष्णा नेरकर यांनी त्याच बस मधून जखमी निकीता आणि तिचा भाऊ वैभव यांना उपचारासाठी आंब्रड येथील दवाखान्यात नेले. तेथून त्यांना अधिक उपचारासाठी कणकवलीतील खाजगी रूग्णालयात आणि त्यानंतर उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. मात्र , निकीता हिला गंभीर दुखापत झाल्याने उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद बस चालक कृष्णा नेरकर यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली. या प्रकरणी वैभव सावंत याच्यावर त्याच्या ताब्यातील दुचाकी रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे भरधाव वेगात चालवून निकीता हिच्या गंभीर दुखापतीस व मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कणकवलीच्या पोलिस उपनिरीक्षक वृषाली बर्गे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. निकीता हिच्या पश्चात आई, वडिल, भाऊ, वहिनी असा परिवार आहे. अधिक तपास कणकवली पोलिस करीत आहेत.
Web Summary : A woman died in Sindhudurg after a motorcycle accident while distributing wedding invitations. She fell and was hit by a bus. The brother driving the motorcycle is booked.
Web Summary : सिंधुदुर्ग में शादी के निमंत्रण बांटते समय मोटरसाइकिल दुर्घटना में एक युवती की मौत हो गई। गिरने के बाद वह बस की चपेट में आ गई। मोटरसाइकिल चला रहे भाई के खिलाफ मामला दर्ज।