‘त्या’ निधीबाबत आपल्याकडे तक्रार नाही
By Admin | Updated: July 20, 2014 22:11 IST2014-07-20T22:07:02+5:302014-07-20T22:11:46+5:30
जयप्रकाश दांडेगावकर : प्रकाराचा वेगळ्या माध्यमातून तपास करणार

‘त्या’ निधीबाबत आपल्याकडे तक्रार नाही
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकडून आमच्यासाठी निधी गोळा केला असल्याबाबत आमच्याकडे कोणतीही माहिती अथवा पुरावे उपलब्ध नाहीत आणि तसा निधी जर जमा केला असेल तर त्याचा आमच्याशी काडीचाही संबंध नाही. आमच्याकडे याबाबतची कोणतीही तक्रार प्राप्त नाही. असा प्रकार घडला असल्यास आम्ही वेगळ्या माध्यमातून त्याचा तपास करू असा खुलासा पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार जयप्रकाश दांडेगांवकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
पंचायत राज समितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून वर्गणी वसूल केल्याबाबत चर्चा सुरु होती. यापूर्वी दोनवेळा अशी वर्गणी गोळा करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी ही पंचायत राज समिती आली नाही. त्यामुळे या निधीचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित होत होता. या संदर्भात शनिवारी पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार जयप्रकाश दांडेगावकर यांनी पत्रकार परिषद घेत असा कोणताही निधी आमच्यासाठी गोळा करण्यात आलेला नाही. वर्तमानपत्रातून येत असलेल्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर आपण याबाबत चौकशी केली. मात्र आपल्याकडे कोणतीही तक्रार प्राप्त झाली नाही. तसेच केलेल्या चौकशीत असा कोणताच प्रकार घडलेला नाही. पण वर्गणीचा प्रकार झाला असेल तर त्याच्याशी आमचा काडीमात्रही संबंध नाही. आम्हाला अशा पैशांची गरज पडत नाही आणि समितीतील कोणीही सदस्य अशा गोष्टींना थारा देत नाही असेही स्पष्ट केले. यावेळी पत्रकारांनी पुराव्यासंदर्भातील पत्र समोर ठेवले असता अशा बाबी घडल्या असतील तर त्याची आपण वेगळ्या पद्धतीने चौकशी करणार असेही दांडेगावकर यांनी स्पष्ट केले.सिंधुदुर्गनगरी येथे पत्रकार परिषदेत समिती सचिव आठवले, आमदार शोभाताई फडणवीस, आमदार विक्रम काळे, आमदार शिंदे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)