भरकटलेली नौका किनाऱ्यावर
By Admin | Updated: October 7, 2016 00:17 IST2016-10-06T23:19:42+5:302016-10-07T00:17:32+5:30
तिसऱ्या दिवशी बंदरात : नौकेवरील खलाशी सुखरूप; कुटुंबियांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

भरकटलेली नौका किनाऱ्यावर
देवगड : तांत्रिक बिघाडामुळे गेल्या दोन दिवसांपासून बंद पडलेल्या व खोल समुद्रात भरकटलेल्या एका फायबर नौकेला गस्तीनौकेच्या सहाय्याने तिसऱ्या दिवशी देवगड बंदरात आणण्यात आले.
प्रभाकर पेडणेकर यांची गणेशसिध्दी ही फायबर नौका यांत्रिक बिघाडामुळे दोन दिवसांपासून बंद पडल्यामुळे खोल समुद्रात भरकटत होती. या नौकेवरील दोन्ही खलाशी सुखरूप असल्याने त्यांच्या कुटुबियांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
देवगड बंदरातील जामसंडे खाकशी येथील प्रभाकर शांताराम पेडणेकर यांच्या मालकीची गणेशसिध्दी ही फायबर नौका मंगळवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास मच्छिमारीसाठी समुद्रात गेली होती. या नौकेवर अर्जुन सुभाष सारंग (४२, रा.तांबळडेग) प्रकाश सदानंद परब (४९, रा. इळयेपाटथर) व वीरेंद्र कोयंडे हे खलाशी होते.
मात्र समुद्रात नौकाजाळी टाकून झाल्यानंतर नौकेचा इंजिनाचा स्टार्टर बसत नसल्यामुळे बंद पडली. जाळी ओढून झाल्यानंतर ही नौका सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तो अपयशी ठरला.
ती रात्र नौकेसह खलाशांनी समुद्रातच काढली. बुधवारी सकाळी या नौकेच्या जवळच असलेल्या चंद्रभागा नौकेवरील खलाशांना नौका बंद पडल्याचे सांगण्यात आल्यानंतर त्या नौकेवरून गणेशसिध्दी या नौकेवरील खलाशी वीरेंद्र कोयंडे याला देवगड बंदरात पाठविण्यात आले.
त्यांनी देवगड बंदरात आल्यानंतर नौकामालक प्रभाकर पेडणेकर यांना समुद्रात बंद पडलेल्या नौकेबद्दल माहिती दिली. त्यानंतर पेडणेकर यांनी बंद पडलेल्या नौकेचा दुसऱ्या नौकेच्या सहाय्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा शोध लागला नाही. तिसऱ्या दिवशी गुरूवारी गिर्ये समुद्रात ३० वावामध्ये भरकटत असलेली नौका देवगड येथीलच मच्छिमारीसाठी गेलेल्या सहारा नौकेला दिसली. त्यांनी नौकेजवळ जाऊन माहिती घेतल्यानंतर यांत्रिक बिघाडामुळे दोन दिवस नौका भरकटत असल्याचे खलाशांनी सांगितले.
यावेळी सहारा या नौकेच्या सहाय्याने बंद पडलेल्या नौकेला आणण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र ती ओढून आणण्यासाठी वापरात आणलेली दोरी वारंवार तुटत असल्यामुळे ही नौका आणणे अशक्य झाले. तरीही सहारा नौकेवरील खलाशांनी देवगड बंदरात आल्यानंतर पेडणेकर यांना त्यांच्या भरकटलेल्या नौकेचा जीपीएस पॉर्इंट दिल्यावर नौकेच शोध सुरु करण्यात
आला. (प्रतिनिधी)