कल्याणकारी योजनेत कामगारांची फसवणूक

By Admin | Updated: August 18, 2014 23:30 IST2014-08-18T22:05:20+5:302014-08-18T23:30:23+5:30

जनजागृतीसाठी मेळाव्याचे आयोजन

Workers fraud in welfare schemes | कल्याणकारी योजनेत कामगारांची फसवणूक

कल्याणकारी योजनेत कामगारांची फसवणूक

शिरगांव : महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणाकरिता १३ प्रकारच्या कल्याणकारी योजना शासनाच्यावतीने राबविल्या जात आहेत. देवगड तालुक्यातील कामगारांना शासनाचे उद्दीष्ट व ही शासनाची योजना आहे. याबाबत माहिती न देता तालुक्यातील पक्षीय संघटना स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी कामगारांकडून वारेमाप नोंदणी फी ची मागणी करून दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत, अशी खरमरीत टीका देवगड पंचायत समितीचे सभापती सदानंद देसाई यांनी शिरगाव येथे केली.
देवगड तालुक्यातील शिरगाव येथे सभापती सदानंद देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या मेळावा १७ आॅगस्ट रोजी झाला. यावेळी देसाई म्हणाले, महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार (रोजगार विनिमय व सेवा शर्ती) नियम २००७च्या नियम ४५च्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाने नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणाकरिता विविध प्रकारच्या १३ कामगार कल्याणकारी योजना कामगार आयुक्तांमार्फत शासनाकडून राबविल्या जातात. या योजनेतील कामगारांच्या नोंदणीसाठी ८५ रूपये नोंदणी फी, जन्मनोंद दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, चार पासपोर्ट फोटो व लाभार्थी १८ ते ५९ वयोगटातील असावा. एवढ्याच कागदपत्रांची आवश्यकता असताना काही राजकीय संघटना आपल्या स्वार्थासाठी शासनाच्या या योजनेची परिपूर्ण माहिती कामगारांना न देता फसवणूक करीत आहेत. कामगारांकडून २०० ते ५०० रूपयांपर्यंत नोंदणी फी घेऊन आर्थिक लूट करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. मेळाव्यात पंचायत समिती सदस्य रविंद्र जोगल, सरपंच अमित साटम, राष्ट्रीय काँग्रेसचे शिरगांव विभागीय अध्यक्ष पंकज दुखंडे, सचिव सुधीर म्हापसेकर, संदीप साटम, सुरेश राणे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

जनजागृतीसाठी मेळाव्याचे आयोजन
शिरगांव जिल्हा परिषद मतदारसंघातील कामगारांसाठी याची माहिती व्हावी, जनजागृती व्हावी, शासनाची योजना कळावी म्हणून सामाजिक जाणिवेतून शिरगांव येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनांच्या माहितीचे परिपत्रक व नोंदणी अर्जासाठी शिरगांव सरपंच अमित साटम यांच्याशी संपर्क साधावा व कामगारांनी आपली होणारी फसवणूक टाळावी, असे आवाहन सभापती देसाई यांनी यावेळी केले.

Web Title: Workers fraud in welfare schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.