तिलारीत कंत्राटी कामगारांचे उपोषण सुरु
By Admin | Updated: November 14, 2014 23:19 IST2014-11-14T22:48:26+5:302014-11-14T23:19:05+5:30
ठोस आश्वासन द्या : आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय

तिलारीत कंत्राटी कामगारांचे उपोषण सुरु
कसई-दोडामार्ग : तिलारी प्रकल्पग्रस्त कंत्राटी कामगारांना कामावरून अन्यायकारकरित्या कमी करण्यात आले. त्यांनी तिलारी कार्यालयासमोर सेवेत पुन्हा समाविष्ठ करण्याच्या मागणीकरिता शुक्रवार सकाळपासून बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे. यावेळी कार्यकारी अभियंता आर. बी. कुरणे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ठोस आश्वासनाशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत हे उपोषण सुरुच होते.
तिलारी येथील कामांवर काम करणाऱ्या व अन्यायकारकरित्या कमी करण्यात आलेल्या कामगारांना पुन्हा सेवेत सामावून न घेतल्यास उपोषण करण्याचा इशारा निवेदनाव्दारे तिलारी प्रकल्पग्रस्त कंत्राटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष दत्ताराम नाईक यांनी तिलारी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांना दिला होता. मात्र, त्यानंतरही कोणतीही कारवाई न झाल्याने संतोष नाईक यांच्यासह कंत्राटी कामगारांनी तिलारी कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तिलारी प्रकल्पग्रस्तांची घरे, जमिनी पाण्याखाली गेल्यामुळे त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. यातील कंत्राटी कामगारांनी १९८५ ते १९९२ सालापर्यंत शासनाच्या हजेरी पटावर असताना कार्यकारी अभियंता तिलारी शीर्षकामे क्र. १ कोनाळकट्टा ता. दोडामार्ग या विभागात संपूर्ण जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील विविध कामे केली आहेत. हजेरीपट बंद झाल्यानंतर ही कामे आमच्याकडून ठेकेदारी पध्दतीने करून घेण्यात येत आहेत. या कामासाठी कामगारांची आवश्यकता असताना कायमस्वरूपी हजर करून घेण्यात टाळाटाळ केली जात आहे. शासनाकडून निधी उपलब्ध होत नाही, असे न पटणारे कारण सांगून काही कामगार व कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे.
उर्वरित कामगारांना ३० नोव्हेंबर २०१४ पासून कमी करण्याच्या तोंडी सूचना दिल्या आहेत. या आडमुठ्या धोरणामुळे गरीब कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रकल्पातील अधिकारी वर्गातील वर्गाकडून न पटणारी कारणे सांगून कामगारांना स्वत:च्या मनाने सेवेतून काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे कामगारांची मन:स्थिती ढासळली असून या विरोधात आमरण उपोषणास बसण्याचा इशारा संघटनेने दिला होता. या उपोषणास बसणाऱ्यांमध्ये अध्यक्ष संतोष दत्ताराम नाईक यांच्यासह सुरेश फटी नाईक, बाळा लाडू लोंढे, सुनील विश्वनाथ शेटवे, सुनील हरिश्चंद्र गवस, महादेव भिकाजी गवस, नितीन गजानन सुतार, तुळशीदास गोपाळ घाडी, नारायण फटी गवस, सुधीर सुरेश पारकर, सुनील आत्माराम सावंत, उदय महादेव नाईक, गणपत भिकाजी गवस, दयानंद वासुदेव गवस, संतोष भिकाजी देसाई, गुरुदास विश्वनाथ शेटवे, सदाशिव महादेव सावंत आदींचा समावेश आहे.
तिलारी विभागाकडून कोणतेच ठोस आश्वासन न मिळाल्याने सायंकाळी उशिरापर्यंत कामगारांचे आंदोलन सुरुच होते. (वार्ताहर)