गाव तेथे कार्यकर्ता अभियान

By Admin | Updated: July 24, 2014 22:09 IST2014-07-24T22:07:02+5:302014-07-24T22:09:38+5:30

मनोज आखरे : संभाजी ब्रिगेडच्यावतीने आयोजन

Worker campaign there village | गाव तेथे कार्यकर्ता अभियान

गाव तेथे कार्यकर्ता अभियान

कणकवली : संभाजी ब्रिगेड हे बिगर राजकीय संघटना आपल्या विचारांशी बांधील राहून न्याय हक्कासाठी गेली २४ वर्षे महाराष्ट्रात काम करीत आहे. विदर्भ, मराठवाड्यानंतर पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणात आगामी १00 दिवसात संघटना वाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. गावागावात संघटनेचे विचार पोहोचविण्यासाठी गाव तेथे कार्यकर्ता हे अभियान राबवून संघटना मजबूत करण्यात येणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संघटनेचे मुख्य समन्वयक सौरभ खेडेकर, ठाणे विभागीय अध्यक्ष दत्ता चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुळशीराम रावराणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मनोज आखरे म्हणाले, संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध लढ्यांमध्ये या संघटनेला चांगले यश प्राप्त झाले आहे. आतापर्र्यत संघटनेने समाज हिताची आंदोलने केली आहेत.
भांडारकर ट्रस्ट, दादोजी कोंडदेव ही प्रकरणे चांगल्या प्रकारे हाताळण्यात आम्हाला यश आले आहे. मराठा आरक्षणासाठी गेली २४ वर्षे आम्ही लढा दिला असून त्याला यश आले आहे.
शासनाने १६ टक्के आरक्षण देण्याचा अध्यादेश काढला तरी महाराष्ट्रात प्रमाणपत्र वाटप करण्यात प्रशासकीय पातळीवर दिरंगाई केली जात आहे. पण हिंगोली प्रांताधिकारी व तहसीलदारांना विश्वासात घेऊन आरक्षणाचा लाभ शैक्षणिकदृष्ट्या होण्यासाठी आम्ही तातडीने प्रयत्न केले. त्यामुळे महाराष्ट्रातील पहिले जात प्रमाणपत्र हिंगोलीत पुरुषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते देण्यात आले. आरक्षणाचा मूळ लढा ओबीसीमध्ये मराठा समाजाला समाविष्ट करण्यासाठी होता. तो लढा यापुढेही कायम सुरु राहणार आहे.
मराठा आरक्षणासाठी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्र्त्यानी महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलने केली. त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे शासनाने मागे घ्यावेत, ३१ जुलैपर्यंत तातडीने मराठा समाजाची जात प्रमाणपत्रे देण्यात यावीत यासाठी आमचे प्रयत्न सुरु राहणार आहेत. तहसील कार्यालयात आमचे कार्यकर्ते उपस्थित राहून जात प्रमाणपत्र काढण्यासाठी समाजातील लोकांना मदत करतील.
येत्या १00 दिवसात अडीच लाख सभासद नव्याने करण्यात येणार आहेत. मराठा समाजाची जनगणना, गाव तेथे वाचनालय, अभ्यासिका, व्यायामशाळा असे उपक्रमही राबविण्यात येणार असल्याचे आखरे यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Worker campaign there village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.