बारा मोठ्या पुलांचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण

By Admin | Updated: May 24, 2017 18:05 IST2017-05-24T18:05:25+5:302017-05-24T18:05:25+5:30

चौपदरीकरण कशेडी-झाराप तिसरा टप्पा

The work of twelve big bridges completed by December | बारा मोठ्या पुलांचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण

बारा मोठ्या पुलांचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण

कशेडी-झाराप तिसरा टप्पा

आॅनलाईन लोकमत

चिपळूण, दि. २४ : मुंबई - गोवा महामार्गाच्या कशेडी ते झाराप या तिसऱ्या टप्प्यातील चौपदरीकरणात येणाऱ्या बाराही मोठ्या पुलांचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. जोडरस्त्यांच्या रखडलेल्या भूसंपादनामुळे उर्वरित काम शिल्लक राहिलेले आहे. या कामासाठी येत्या डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची शिफारस राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून केली गेली आहे. अडीच वर्षांपूर्वी या पुलाच्या कामाचे आदेश देण्यात आले असून, ही दुसरी मुदतवाढ आहे.

महामार्ग चौपदरीकरणातील महत्त्वपूर्ण असलेल्या पुलांची कामे प्राधान्याने हाती घेण्यात आली. त्यानुसार खेड तालुक्यातील कशेडी ते सिंधुदुर्गपर्यंत एकूण १४ मोठे पूल असून, राजापूर येथील पूल त्यातून वगळण्यात आला आहे. उर्वरित १३ पुलांमध्ये कोळंबेवगळता जगबुडी, वाशिष्ठी नदीवर दोन, शास्त्री, सप्तलिंगी, आंजणारी, वाकेड, खारेपाटण, जानवली, कसाल, बांबुळ आदी पुलांची कामे सुरु झाली आहेत. यातील बहुतांश पुलांची कामे पूर्णत्त्वाच्या मार्गावर आहेत.

नदी प्रवाहातील पुलांच्या स्लॅबसह अन्य कामे प्रगतीपथावर असून, पुलांच्या दोन्ही बाजूंच्या जोडरस्त्यासाठी भूसंपादन, त्याबाबतचा जमीन मालकांना मोबदला व त्यानंतरची ताबा पावती झालेली नसल्याने पूल जोडता आलेले नाहीत. सद्यस्थितीत जमीन मालकांना मोबदला वाटपाचे काम सुरु असून, ताबा पावतीची प्रक्रिया पूर्णत्वास गेल्यानंतर याबाबतची पुढील कार्यवाही पूर्णत्वास जाणार आहे. यामध्ये शास्त्री व कोळंबे पुलाच्या जोडरस्त्याबाबत ताबा पावती झाल्याने तेथील काम सुरु करण्याचे पत्र कंपनीला देण्यात आले आहे.

जोडरस्त्यांबरोबर वाळू व खडी उपलब्ध होत नसल्याची तक्रार काम करणाऱ्या कंपन्यांनी केली असून, त्यानुसार मुदतवाढीची मागणी केली आहे. या कंपन्यांना सुरुवातीला दिलेली १८ महिन्यांची मुदत डिसेंबर १६मध्ये संपल्यानंतर पुन्हा जून १७पर्यंत पहिली सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. मात्र, या कालावधीतही जोडरस्त्यांचा प्रश्न न सुटल्याने कामासाठी आता पुन्हा डिसेंबरपर्यंत दुसरी मुदतवाढ देण्यात आली आहे.

Web Title: The work of twelve big bridges completed by December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.