निर्मल ग्रामसाठी काम करा
By Admin | Updated: December 26, 2014 23:51 IST2014-12-26T22:32:06+5:302014-12-26T23:51:33+5:30
रणजित देसाई : कुडाळमधील बैठकीत आवाहन

निर्मल ग्रामसाठी काम करा
कुडाळ : भारतातील पहिला निर्मल जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग होण्यासाठी ३१ जानेवारी २०१५ पर्यंत निर्मल ग्रामयोजना जिल्ह्यातील गावांमध्ये योग्यप्रकारे राबवून यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करा, असे आवाहन जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी कुडाळ तालुक्याच्या निर्मल ग्राम योजनेअंतर्गत बैठकीत केले.
शासनाची निर्मल ग्राम योजना सुरू झाली, तरी अजूनही कुडाळ तालुक्यातील २० गावे निर्मळ झाली नाहीत. या गावांना निर्मळ होण्यासाठी आवश्यक असलेली उद्दिष्ट्ये संबंधित अधिकाऱ्यांनी पूर्ण केलीत की नाही, या संदर्भात माहिती समजून घेण्यासाठी कुडाळ पंचायत समितीच्या सभागृहात या २० गावांतील ग्रामसेवक, सरपंच व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. या बैठकीला जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, उपमुख्यकार्यकारी अधिकारी सुनील रेडकर, उपसभापती आर. के. सावंत तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांकडून शौचालयाच्या बांधकामासंदर्भात दिलेली उद्दिष्ट्ये पूर्ण झाली की नाहीत, याची माहिती उपस्थित मान्यवरांनी घेतली. यावेळी ग्रामसेवकांनी सादर केलेल्या आकडेवारीत व अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या आकडेवारीत काही ठिकाणी तफावत आढळली. त्यामुळे योग्यप्रकारे ही योजना सुरू आहे की फक्त कागदोपत्रीच आहे, असा प्रश्न पडला होता.
यावेळी काही ग्रामसेवकांनी, गावातील त्यांच्या अख्यत्यारित असलेल्या गावातील शौचालयांची बांधणी मोठ्या प्रमाणात पूर्णत्वाकडे नेली नव्हती. यापुढे हे असे चालणार नाही. सर्व शौचालये येत्या ३१ जानेवारी २०१५ पर्यंत पूर्ण केलीच पाहिजेत, असे सुनावले.
यावेळी काही ग्रामस्थांनी शौचालय बांधतेवेळी जमिनींचा तसेच इतर प्रश्न उद्भवतात, असे सांगितले. यावर जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी या संदर्भातील बैठकीला तेथील लोकप्रतिनिधींना बोलवा, जेणेकरून त्यांच्याकरवी अनेक प्रश्न मार्गी लागतील, असे सांगितले.
जिल्हा राज्यात पुढे : देसाई
आपला सिंधुदुर्ग जिल्हा राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत निर्मळ ग्राम योजनेत खूप पुढे असल्याचे सांगून, निर्मळ जिल्हा म्हणून भारतात प्रथम येण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून काम करूया, असे आवाहन केले. (प्रतिनिधी)