महिला सरपंचाला लाच घेताना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2015 00:24 IST2015-08-22T00:21:43+5:302015-08-22T00:24:00+5:30

स्मशानभूमी शेडच्या कामाचा धनादेश काढण्यासाठी

Women Sarpanch arrested for taking bribe | महिला सरपंचाला लाच घेताना अटक

महिला सरपंचाला लाच घेताना अटक

चिपळूण : स्मशानभूमी शेडच्या कामाचा धनादेश काढण्यासाठी ठेकेदाराकडून १२ हजार रुपयांची लाच घेताना मार्गताम्हाणे खुर्दच्या महिला सरपंचांना रंगेहाथ अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता त्या महिलेच्या घरीच ही कारवाई केली असून, शुभांगी दत्ताराम पालशेतकर असे या महिला सरपंचाचे नाव आहे.
मार्गताम्हाणे खुर्द सुतारवाडी येथे जनसुविधा योजनेअंतर्गत स्मशानभूमीतील दहन शेडचे काम सुभाष चव्हाण या ठेकेदाराने केले. या कामाच्या बिलापोटी आपल्याला एक लाख २० हजार रुपयांचा धनादेश मिळावा यासाठी चव्हाण यांनी वारंवार सरपंच शुभांगी दत्ताराम पालशेतकर (वय ४२) यांच्याकडे विनंती केली. सुरुवातीला सरपंचांनी चालढकल केली. परंतु, त्यानंतर या व्यवहारापोटी त्यांनी १५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. अखेर हा व्यवहार १२ हजार रुपयांवर थांबला.
दोन महिने सरपंचाकडून पैशांसाठी तगादा सुरू होता. त्यामुळे चव्हाण हैराण झाले होते. त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दि. १३ जुलै रोजी तक्रार केली होती. त्यावरून दि. १६ जुलै रोजी पडताळणी करण्यात आली होती. त्यावेळीस बिलाच्या रकमेचे चेक देताना तडजोडीअंती १२ हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता समर्थ नर्सरी गुहागर-चिपळूण रोडवर मार्गताम्हाणे येथे ठेकेदाराकडून १२ हजार रुपये लाच स्वीकारताना सरपंच पालशेतकर यांना पंचासमक्ष पकडण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सतीशकुमार गुरव, पोलीस निरीक्षक दीपक बर्गे, पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, सहायक पोलीस उपनिरीक्षक मामा शिवगण, बाळू जाधवर, चालक गौतम कदम, हवालदार दिनेश हरचकर, संतोष कोळेकर, पोलीस नाईक प्रकाश सुतार, नंदकिशोर भागवत, प्रवीण विज, महिला पोलीस नाईक जयंती सावंत यांच्या पथकाने ही कामगिरी केली. (प्रतिनिधी)

Web Title: Women Sarpanch arrested for taking bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.