टोळक्याकडून पोलिसासह महिलांना मारहाण
By Admin | Updated: November 28, 2014 23:51 IST2014-11-28T22:10:28+5:302014-11-28T23:51:37+5:30
काहीजणांनी मद्यप्राशन केले होते,

टोळक्याकडून पोलिसासह महिलांना मारहाण
मालवण : मालवण शहरात शुक्रवारी चारजणांच्या टोळक्याकडून पोलीस कर्मचाऱ्यांसह एका युवकाला तसेच काही महिलांना मारहाण करण्यात आली. ही घटना सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या टोळक्यातील काहीजणांनी मद्यप्राशन केले होते, असे घटनास्थळावरून सांगण्यात आले.
मोठा जमाव जमल्याने यावेळी शहरातील वातावरण काहीकाळ तणावपूर्ण झाले होते. घटनेची माहिती समजाच पोलीस फाट्यासह पोलीस निरीक्षक विश्वजीत बुलबुले यांनी धाव घेतली. मात्र, गर्दीचा फायदा घेऊन मारहाण करणारे पळून जाण्यात यशस्वी झाले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तसेच या हल्लेखोरांना पकडण्यास पोलीस पथके रवाना करण्यात आली होती. शहरातील भरड नाक्याजवळून राजेश दीपक कामतेकर हा युवक आपल्या दुचाकीवरून घरी जात होता. याचवेळी त्याच्यासमोर दुचाकीवरून राजेश पारकर, साईराज पारकर, रणजीत पारकर हे तिघे पारकर बंधू आले. राजेश कामतेकर याला त्यांनी थांबविले. तो काही बोलायच्या आत तिघांनीही कामतेकर याला मारहाण करण्यास सुरूवात केली. कामतेकर याला बेदम मारहाण केल्यानंतर तिघेही युवक ट्रिपल सीट बाजारपेठेच्या दिशेने रवाना झाल्याचे समजताच वाहतूक पोलीस विठ्ठल धुरी व कदम यांनी त्यांचा पाठलाग करून बाजारपेठेमध्ये पकडले.
ट्रिपल सीट पळत असलेल्या राजेश पारकर, साईराज पारकर, रणजीत पारकर यांनी वाहतूक पोलीस विठ्ठल धुरी यांनी पकडल्यानंतर त्यांनाही शिवीगाळ करीत तिघांनीही मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी तिथे आलेल्या कदम व परूळेकर या पोलीस कर्मचाऱ्यांवरही त्या युवकांनी हात उचलला. विठ्ठल धुरी यांचा राजेश याने हात पिळवटून त्यांचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक विश्वजीत बुलबुले काही पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी आले. मात्र गर्दीचा फायदा घेऊन मारहाण करणारे पळून जाण्यात यशस्वी झाले. दरम्यान, बाजारपेठेत मोठा जमाव जमला होता. संतप्त झालेल्या जमावाला शांत करणे पोलिसांना कठीण जात होते. अखेरीस जमावाला शांत करून मारहाण झालेल्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलीस कर्मचारी विठ्ठल धुरी यांना मारहाणप्रकरणी चौघाजणांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे बुलबुले यांनी सांगितले. दरम्यान, कामतेकर कुटुंबीयही तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले होते. (प्रतिनिधी)