रत्नागिरी जिल्ह्यात १ लाख १५ हजार कुटुुंबीय शौचालयाविना
By Admin | Updated: September 17, 2014 22:26 IST2014-09-17T22:08:16+5:302014-09-17T22:26:08+5:30
जिल्हा परिषद : निर्मल भारत अभियानांचे आव्हान

रत्नागिरी जिल्ह्यात १ लाख १५ हजार कुटुुंबीय शौचालयाविना
रत्नागिरी : जिल्ह्यातील १,१५,५७१ कुटुंबीयांकडे वैयक्तिक शौचालये नसल्याचे पाहणी दरम्यान स्पष्ट झाले आहे. ही शौचालये २०२२ पर्यंत बांधून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निर्मल भारत अभियानांतर्गत जिल्हा परिषदेने समोर ठेवले आहे.
उघड्यावर शौचास बसणे म्हणजे रोगराईला निमंत्रण देण्याचाच एक भाग आहे. रत्नागिरी जिल्हा निर्मल करतानाच प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असणे आवश्यक आहे. त्यासाठी मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. मात्र, सध्या आवश्यक तेवढ्या प्रमाणात जनजागृती होत नसल्याचे दिसून येत आहे.
इतर जिल्ह्यांपेक्षा रत्नागिरी जिल्हा आरोग्याच्या दृष्टीने फार पुढे आहे. त्यासाठी ग्रामीण भागामध्येही स्वच्छतेला महत्व दिले जाते. निर्मल भारत अभियानांतर्गत प्रत्येक कुटुंबाला शौचालय बांधण्यासाठी ४ हजार ६०० रुपये अनुदान, तर एमआरजीएसमधून १० हजार रुपये अनुदान देण्यात येते.
जिल्ह्यातील अनेक गावे निर्मलग्राम झाली आहेत. तरीही अनेक गावांमधील कुटुंबांमध्ये शौचालये नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात या अभियानाचा हेतूच धोक्यात आल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील किती कुटुंबीयांकडे वैयक्तिक शौचालये नाहीत, याबाबत निर्मल भारत अभियानांतर्गत सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) ३५,२७५ कुटुंबीयांकडे आणि दारिद्र्यरेषेवरील ७४,६७६ कुटुंबीय, एससी - ४५८४, एस. टी. - १०३६ व शौचालय नसल्याचे दिसून येत
आहे.
जिल्हा रोगमुक्त व्हावा, हा उद्देश समोर ठेवूनच जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांकडून जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने प्रस्ताव मागविले होते. प्रत्येक कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय असणे आवश्यक असले तरी लोकप्रतिनिधींकडून याबाबत योग्य प्रमाणात जनजागृती करण्यात येत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे ग्रामीण भागात या योजनेचा आता पुरता बोजवारा उडाला आहे. त्याचा संपूर्ण भार प्रशासकीय यंत्रणेवर पडत आहे. (शहर वार्ताहर)