काही तासातच ठरतील आमदार
By Admin | Updated: October 19, 2014 00:25 IST2014-10-19T00:24:04+5:302014-10-19T00:25:25+5:30
विधानसभा निकाल : सर्वांची उत्कंठा शिगेला

काही तासातच ठरतील आमदार
कणकवली : अनेक नाट्यमय घडामोडींमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात लक्षवेधी ठरलेल्या विधानसभा मतदारसंघातील लढतींचा निर्णय आता अवघ्या काही तासांवर आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन आमदार कोण होणार? याबाबतची उत्सुकता केवळ राजकारणातीलच नाही तर सर्वस्तरातील लोकांमध्ये पसरली आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा अनुभव निर्णायक होणार की, त्यांच्या सर्वच राजकीय विरोधकांनी खेळलेल्या खेळी यशस्वी होणार याबाबत प्रचंड कुतूहल निर्माण झाले आहे. रविवारी सकाळी काही तासातच मतमोजणीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे. पण, तोपर्यंत उमेदवार आणि कार्यकर्त्यांबरोबरच सामान्य जनतेमध्येही ‘दिल धक धक करने लगा’ अशी अवस्था आहे.
सिंधुदुर्गातील विधानसभेच्या तिन्ही मतदारसंघात बहुरंगी लढती होणार आहेत. २४ उमेदवार निवडणूक रिंगणात नशिब अजमावत आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंसह आमदार प्रमोद जठार आणि माजी आमदार दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसतर्फे नीतेश राणे, भाजपातर्फे प्रमोद जठार, शिवसेनेतर्फे सुभाष मयेकर, राष्ट्रवादीतर्फे अतुल रावराणे, बसपातर्फे चंद्रकांत जाधव, भारतीय शेतकरी कामगार पक्षातर्फे डॉ. तुळशीराम रावराणे, काँग्रेसचे बंडखोर आमदार विजय कृष्णाजी सावंत आणि विजय श्रीधर सावंत निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे कणकवलीतील लढत लक्षवेधी आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसतर्फे बाळा गावडे, भाजपातर्फे राजन तेली, शिवसेनेतर्फे दीपक केसरकर, राष्ट्रवादीतर्फे सुरेश दळवी, मनसेतर्फे परशुराम उपरकर, बसपातर्फे वासुदेव जाधव, हिंदू महासभेतर्फे अजिंक्य गावडे तर अपक्ष म्हणून किशोर लोंढे, उदय पास्ते आणि संजय देसाई हे तिघेजण रिंगणात आहेत. त्यामुळे सावंतवाडीतील लढतही बहुरंगी झाली.
कुडाळ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसतर्फे नारायण राणे, भाजपातर्फे विष्णू मोंडकर, शिवसेना वैभव नाईक, राष्ट्रवादी पुष्पसेन सावंत, बसपातर्फे रवींद्र कसालकर आणि अपक्ष म्हणून स्नेहा केरकर निवडणूक रिंगणात आहेत. प्रत्यक्षात मात्र राणे विरूद्ध नाईक अशीच खरी लढत झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कासार्डे येथे प्रचार सभा झाल्याने त्याचा कितपत परिणाम निवडणूक निकालावर होतो हेही औत्सुक्याचे आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी घेतलेल्या सभेमुळेही निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. एकीकडे राजकीय वर्चस्वाची चुरस वाढलेली असताना दुसरीकडे मतदानाचा टक्का वाढल्याने आणखीनच रंगतदार अवस्था निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी एकत्र जमून निकाल पाहण्याचे किंबहुना निकाल‘एन्जॉय’ करण्याचे प्लॅनिंगही सुरू आहे. (वार्ताहर)