रत्नागिरी-चिपळूण मार्गावर धावणार ‘विनाथांबा; विनावाहक’ एस. टी.
By Admin | Updated: January 1, 2015 00:17 IST2014-12-31T21:55:49+5:302015-01-01T00:17:53+5:30
प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन २६ जानेवारीपासून देवरूख - रत्नागिरी मार्गावर विनाथांबा, विनावाहक एस. टी. सुरू करण्याचा निर्णय

रत्नागिरी-चिपळूण मार्गावर धावणार ‘विनाथांबा; विनावाहक’ एस. टी.
रत्नागिरी : ‘बहुजन हिताय - बहुजन सुखाय’ ब्रीदवाक्य असलेल्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने प्रवाशांना सुरक्षित व सुरळीत सेवा देण्यासाठी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून ‘विनाथांबा, विनावाहक’ एस. टी. सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन २६ जानेवारीपासून देवरूख - रत्नागिरी मार्गावर विनाथांबा, विनावाहक एस. टी. सुरू करण्याचा निर्णय विचाराधीन असल्याचे विभाग नियंत्रक के. बी. देशमुख यांनी सांगितले.
सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत रत्नागिरी व चिपळूण येथून गाड्या सोडण्यात येणार आहेत. रत्नागिरीतून १२ व चिपळुणातून १२ मिळून एकूण २४ फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. रत्नागिरी व चिपळूण बसस्थानकातून या गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाडीच्या आरक्षणासाठी बसस्थानकात स्वतंत्र बुकिंग कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
रत्नागिरी - चिपळूण मार्गावर सुरू असलेल्या अवैध, वडाप वाहतुकीमुळे एस. टी.चे होणारे नुकसान लक्षात घेता या मार्गावर विनाथांबा गाडी सुरू करण्यात येणार आहे. खेड, गुहागर तालुक्यातून रत्नागिरीत येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. बऱ्याच वेळा थेट गाड्यांऐवजी गाड्या बदलून येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. नियमित चिपळूण - रत्नागिरी प्रवासासाठी अडीच तास लागतात. आता विनाथांबा बसमुळे अवघा एक तास ५० मिनिटे लागणार आहेत. विनाथांबा प्रवासासाठी ‘मिडी बस’ यशवंती सोडण्यात येणार आहे.
विनाथांबा व विनावाहक बससाठी दिवसभर चार वाहक व १२ चालक कार्यरत राहणार आहेत. रत्नागिरी व चिपळुणात प्रत्येकी २ वाहक, तर ६ चालक कार्यरत राहणार असून, प्रत्येक चालक दिवसभरात दोन फेऱ्या मारणार आहे. वाहक मात्र बसस्थानकात आरक्षण कक्षातून आरक्षण उपलब्ध करून देणार आहेत. यामुळे प्रवाशांची सोय होईल.
रत्नागिरी विभागात मार्चअखेर एकूण १०० नवीन गाड्या उपलब्ध होणार असून, पैकी २५ नवीन गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. शिवाय ४४१ नवीन चालक हजर झाल्यामुळे चालकांवरील ताण कमी झाला आहे. या नव्या प्रयोगामुळे एस. टी.ची हा नवा प्रयोग यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
२६ जानेवारी
देवरूख-रत्नागिरी मार्गावर विनाथांबा विचाराधीन.
१ तास ५0 मि.
चिपळूूण - रत्नागिरी अंतर कापणार.
24
मिडी बसेस
सोडण्यात येणार.