विस्तार अधिकारीही अपात्र ठरणार ?

By Admin | Updated: July 26, 2015 00:01 IST2015-07-25T23:55:28+5:302015-07-26T00:01:18+5:30

आग्रा संस्थेची पदवीही वादात : जिल्हा परिषदेकडून चौकशी सुरू

Will extension officer be ineligible? | विस्तार अधिकारीही अपात्र ठरणार ?

विस्तार अधिकारीही अपात्र ठरणार ?

रत्नागिरी : अलाहाबाद विद्यापीठाच्या बोगस पदवीनंतर आता केंद्रीय हिंदी संस्थान आग्रा या ऐच्छिक हिंदी संस्थेमधून बी.एड. पदवी घेतलेल्या दापोलीच्या विस्तार अधिकाऱ्यांची पदवीही वादात सापडली आहे. २६ शिक्षकांना पदावनती देण्यात आल्यामुळे या कारवाईकडेही शिक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.
अलाहाबाद विद्यापीठातून बी.एड. पदवी घेतलेल्या ५१ शिक्षकांवर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी कारवाई केली. त्यापैकी २६ जणांना त्यांच्या मूळ जागेवर म्हणजेच उपशिक्षक पदावर पदावनत केले. यामध्ये केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि विस्तार अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे शिक्षकांमध्ये खळबळ उडालेली असतानाच आग्रा येथील केंद्रीय हिंदी संस्थानची बी.एड. पदवीही वादात अडकली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय समितीने अलाहाबाद विद्यापीठाच्या पदवीप्रमाणे आग्रा केंद्रीय हिंदी संस्थानच्या बी.एड. पदवीची तपासणी केली आहे. त्यामध्ये दापोली पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी नंदलाल शिंदे यांची शुक्रवारी चौकशी केली. त्यामध्ये शिंदे यांनी आग्रा येथील आपली बी.एड. पदवीची कागदपत्रे समितीसमोर सादर केली. शिंदे यांनी हिंदी राष्ट्रभाषा सभा, पुणे या संस्थेची राष्ट्रभाषा पंडित ही पदवी घेतली. ही पदवी पदोन्नतीसाठी किंवा सरळ सेवा भरतीसाठी मान्यता प्राप्त नाही. शिंदे यांनी पंडित पदवीनंतर केंद्रीय हिंदी संस्थान आग्रातून बी.एड. पदवी १९९९ ला मिळवली. पुन्हा त्यांनी २००४ ला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बी.ए. पदवी घेतल्याचे कागदपत्रांवरून पुढे आले आहे. आग्रा येथील संस्थेची पदवीही बोगस असल्याची माहिती पुढे येत असल्याने शिंदे अडचणीत आले आहेत. त्यामुळे अलाहबाद पदवीधरांप्रमाणे शिंदे यांच्यावरही कारवाई होण्याची चर्चा जोर धरत आहे. (शहर वार्ताहर)

Web Title: Will extension officer be ineligible?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.