‘व्हॉटस्अॅप’वरील वायफळ पोस्टला चाप हवा
By Admin | Updated: July 4, 2015 00:12 IST2015-07-03T22:36:35+5:302015-07-04T00:12:33+5:30
तरुणाईने सामाजिक गांभीर्य जपावे : गैरवापर टाळावा; सोशल मीडियातून खूप काही शिकण्यासारखे

‘व्हॉटस्अॅप’वरील वायफळ पोस्टला चाप हवा
सिद्धेश आचरेकर -मालवण -वन्यजीव तंत्रज्ञानातील गतिमान क्रांती म्हणजे व्हॉटस्अॅप. सोशल मीडियातील एक अग्रेसर अॅप्स. लहानांपासून थोरांपर्यंत अगदी सोप्या पद्धतीने हाताळता येणारे हे अॅप्स आता वायफळ गोष्टींना अधिक महत्त्व देत आहे. यात तरुणवर्ग अधिक भरकटत चालला आहे. सोशल मीडिया हे सर्वांपर्यंत पोहोचण्याचे उत्कृष्ट माध्यम आहे. मात्र, त्याचा गैरवापर होऊन वायफळ पोस्टना अधिक प्राधान्य दिले जात आहे. तरुणांनी सामाजिक बांधीलकी जपत अश्लील अथवा वायफळ पोस्टबाजीला लगाम लावायला हवा. शक्य तेवढा गैरवापर टाळून आधुनिक विचारांच्या देवाण-घेवाणींसाठी वापर होणे गरजेचे आहे.
आजच्या युगात सुशिक्षित पिढीकडून जगाला मोठ्या आशा आहेत. मात्र, युवा पिढी चंगळवादाच्या आहारी जात आहे. वायफळ शेरेबाजीला महत्त्व देण्यापेक्षा पुरोगामी विचारांच्या पोस्ट टाका. सेलिब्रेटी अथवा नेत्यांबद्दल भावनिक मजकूर शेअर करण्यापेक्षा त्यांच्या विचारांना प्रसिद्धी द्या. सोशल मीडियाचा योग्य वापर तरुणांनी करायचे ठरविले, तर सर्व काही शक्य आहे.
सोशल मीडियातून खूप काही शिकण्यासारखे
सोशल मीडियामुळे माणसामाणसांतील नात्यात दरी निर्माण होत आहे, अशी ओरड ऐकायला मिळते; पण याच सोशल मीडियाच्या माध्यमातून कितीतरी नाती जोडली गेली आहेत. याला काही अपवाद असतीलही; पण सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियाचा वापर करून सर्वांना भुरळ घातली. हे सर्वश्रूतच आहे. एकूणच नातेसंबंध व सामाजिक काम साध्य करण्यासाठी मानवी जीवनात सोशल
मीडियातून खूप शिकण्यासारखे असतेही.
विचारांची देवाणघेवाण
मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा व्हॉटस्अॅपवर ग्रुप आहे. या ग्रुपवर शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक, चित्रपट, आदी विषयांवर आठवड्यातून एकदा चर्चा होते. ग्रुपमधील सदस्य सहभागी होऊन विचार व अभिप्राय मांडतात. यात मार्गदर्शकाची भूमिका प्रा. सुमेधा नाईक बजावतात. ‘ही चर्चा अमुची’ हा त्यांचा उपक्रम आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून, जर समाजात अशाप्रकारे चर्चात्मक उपक्रम राबविल्यास नक्कीच नवे विचार वृद्धिंगत होऊ शकतात, एवढे मात्र नक्की.
वायफळ पोस्टला लगाम हवाच
आतापर्यंत विविध अभिनेते, अभिनेत्री तसेच राजकीय व राष्ट्रीय नेते यांच्याबद्दल सोशल मीडियातून खिल्ली उडविली जाते. यातून वाद उफाळतो. समाजात तेढ निर्माण होते. आलिया भट, आलोकनाथ, रजनीकांत, श्री-जान्हवी, शरद पवार, आदी सेलिब्रेटींची टेर खेचली जाते. अशांवर कायद्याचे लक्ष असतानासुद्धा त्यांचे विडंबन थांबता थांबत नाही. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील श्री-जान्हवीच्या अश्लील डायलॉगांनी, तर कहरच माजविला आहे.
नेत्यांची अवहेलना टाळावी
एखादा राष्ट्रीय नेता म्हटला की, सुरुवातीलाच येतो तो त्या नेत्याचा समाज. राष्ट्रीय नेत्यांवरील पोस्ट टाकून आतापर्यंत कितीतरी संघर्षात्मक लढाया झाल्या आहेत, असे समाजात अस्थिरता पसरविणाऱ्यांनी थोर महापुरुषांचे कार्य सर्वांना उलगडून सांगितले पाहिजे. केवळ नेत्यांचे फोटो टाकून कमेंट्स किंवा लाईक मिळविण्यापेक्षा त्यांचे समाजाप्रती असणाऱ्या बहुमूल्य विचारांची देवाण-घेवाण झाल्यास देशाच्या प्रगतीस नक्कीच हातभार लागू शकतो. थोर पुरुषांवर कित्येक पुस्तके आहेत. त्या पुस्तकांतून त्यांच्या विचारांचा संदेश सोशल मीडियातून जगासमोर आणावा.